पोलिसांची सागरी किनाऱ्यावर करडी नजर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिसांची सागरी किनाऱ्यावर करडी नजर
पोलिसांची सागरी किनाऱ्यावर करडी नजर

पोलिसांची सागरी किनाऱ्यावर करडी नजर

sakal_logo
By

भाईंदर, ता. १५ (बातमीदार) : समुद्रमार्गे दहशतवादाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन भारतीय नौदलाच्या वतीने सागरी सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. मिरा-भाईंदर वसई-विरार पोलिस आयुक्तालय कार्यक्षेत्रात मत्स्यव्यवसाय विभाग, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, सीमा सुरक्षा दल, तटरक्षक दल आदी विभागांशी समन्वय राखून पोलिसांकडून सागरी सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. मंगळवारी सकाळपासून या अभियानाला सुरुवात झाली असून बुधवारी रात्रीपर्यंत ते सुरु राहणार आहे. या अभियानादरम्यान समुद्र मार्गाने होणाऱ्या संशयित हालचाली तसेच समुद्रकिनारी भागातील परिसरामध्ये वावरणाऱ्या संशयित व्यक्तींवर करडी नजर ठेवली जात आहे तसेच शहरातील प्रमुख रस्त्यांवरही वाहनांची तपासणी सुरु करण्यात आली आहे.

या अभियानात आयुक्तालयातील १६० पोलिस अधिकारी, ४९० पोलिस अंमलदार, महाराष्ट्र सुरक्षा बल व होमगार्डचे १७० जवान यांचा समवेश करण्यात आला आहे. अभियानांतर्गत पोलिसांकडून समुद्रात गस्त घालण्यात येत आहे. पोलिस आयुक्तालयाच्या सर्व सागरी पोलिस ठाण्यांतर्गत शपथ स्पीड बोट, वंदेमातरम व ग्लोरियस या खासगी नौका यांच्या साहाय्याने उत्तन ते विरारपर्यंतचा सागरी किनारा, समुद्रातील वाशी खडक आदी ठिकाणी पोलिसांकडून सशस्त्र गस्त सुरू करण्यात आली आहे. तसेच शहरातील मुख्य रस्त्यावर वाहनांची कडक तपासणी केली जात असून ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येत आहे. अभियानात सहभागी असणारे पोलिस त्यांचे कर्तव्य योग्यरित्या पार पाडत आहेत की नाही यावर देखील वरिष्ठांकडून नजर ठेवली जात आहे.

पोलिसांकडून जनजागृती
मिरा-भाईंदर वसई-विरार आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये उत्तन सागरी पोलिस स्टेशनच्या हद्दीत वेलंकनी, उत्तन, चौक, वसई विरार या भागात समुद्र किनाऱ्‍यामार्गे दहशतवादी शहरात शिरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मार्गे एखादी संशयास्पद व्यक्ती अथवा दहशतवादी दिसला तर त्याला कशा पद्धतीने रोखायचे याचीही माहिती या अभियानात दिली जात आहे. त्याचबरोबर समुद्रात मासेमारी जाणाऱ्या मच्छीमारांनी देखील एखादी अनोळखी बोट समुद्रात संशयास्पद दिसल्यास त्याची माहिती पोलिसांना द्यावी यासाठी पोलिसांकडून जनजागृती केली जात आहे.