जव्हारमध्ये ५० हजार महिलांची तपासणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जव्हारमध्ये ५० हजार महिलांची तपासणी
जव्हारमध्ये ५० हजार महिलांची तपासणी

जव्हारमध्ये ५० हजार महिलांची तपासणी

sakal_logo
By

जव्हार, ता. १५ (बातमीदार) : जव्हार तालुक्यातील बहुतांश समुदाय हा ग्रामीण भागात वास्तव्यास आहे. रोजगार, शिक्षणाच्या समस्या आणि निसर्गावर अवलंबून असलेली शेती त्यामुळे या भागात शासकीय योजनेच्या माध्यमातून येथील जीवनमान सुधारण्यासाठी आरोग्य विभागाच्या माध्यमातून अनेक योजना राबविल्या जात आहेत. यातच ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ या अभियानाला तालुक्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत ५० हजार मुली व महिलांनी या मोफत आरोग्य तपासणी अभियानाचा लाभ घेतला आहे.
राज्य शासन ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ हे अभियान राज्यभरात राबवत आहे. या अभियानांतर्गत जव्हार तालुक्यातील ५० हजार मुली व महिलांची मोफत तपासणी आरोग्य विभागामार्फत करण्यात आली होती. सुरुवातीला हे अभियान केवळ नऊ दिवस चालवायचे होते; मात्र या अभियानाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर त्याची मुदत वाढविण्यात आली आहे. आता १५ नोव्हेंबरपर्यंत हे अभियान चालविले जाणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्राअंतर्गत आरोग्य सेविका प्रत्येकाच्या घरी जाऊन आरोग्य तपासणी करत आहेत. एखाद्या रुग्णासोबत त्याची नातेवाईक महिला दवाखान्यात आली असल्यास तिचीसुद्धा आरोग्य तपासणी केली जाते. तालुक्यातील महिला स्वतःहून आरोग्य तपासणी करण्यास तयार होत नाही. अशा परिस्थितीत या अभियानाचा मोठा फायदा दुर्गम व ग्रामीण भागातील महिलांना झाला.

................................
अभियानातील तपासण्या
या अभियानांतर्गत रक्तदाब, शुगर, ॲनिमिया, थायरॉईड, कॅन्सर आदी रोगांची तपासणी निःशुल्क केली जात आहे. एखाद्या महिलेला आजाराची लागण झाली असल्याचे लक्षात आल्यास तिला तत्काळ भरती करून उपचार केले जात आहेत.
...............................
गर्भवती मातांची तपासणी
गरोदरपणाच्या कालावधीत महिलांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. यादरम्यान महिलांना रक्तदाब, थॉयरॉईडचा त्रास वाढण्याची शक्यता राहते. त्यामुळे या अभियानांतर्गत गर्भवती मातांची तपासणी करण्यावर विशेष भर दिला जात आहे. आरोग्य विभागामार्फत तालुक्यातील गावात शिबिरांचे आयोजन केले जात आहे. आतापर्यंत ३३९८ महिलांची या अभियानातून नोंद झाली आहे.

.........................
तपासणीत काय आढळले?
तालुक्यात महिला, माता व १८ वर्षांवरील मुलींची आरोग्य तपासणी झाली. यात ३३९८ गरोदर महिला, रक्तदाब रुग्ण ८२, मधुमेह १३, क्षयरोग रुग्ण ९, कुष्ठ रोग रुग्ण १६ आढळले आहेत.

‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानांतर्गत महिलांची आरोग्य तपासणी केली जात आहे. तालुक्यात या अभियानाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. तपासणी अगदी मोफत असल्याने प्रत्येक महिलेने तपासणी करून घ्यावी.
- डॉ. किरण पाटील, तालुका आरोग्य अधिकारी जव्हार,