रुग्णालयातील असुविधांवरून आगपाखड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रुग्णालयातील असुविधांवरून आगपाखड
रुग्णालयातील असुविधांवरून आगपाखड

रुग्णालयातील असुविधांवरून आगपाखड

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १६ ः महापालिका रुग्णालय आणि नागरी आरोग्य केंद्रांमध्ये निर्माण झालेल्या औषधांच्या तुटवड्याचे पडसाद मंगळवारी महापालिका मुख्यालयात उमटले. या प्रश्नाला ‘सकाळ’ने वाचा फोडल्यानंतर ऐरोलीचे भाजप आमदार गणेश नाईक यांनीदेखील महापालिका प्रशासनाला धारेवर धरत अधिकाऱ्यांना इतर कामांच्या निविदांपेक्षा आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या बाबींवर लक्ष देण्याचे खडे बोल सुनावले.
नवी मुंबई महापालिकेच्या सर्व रुग्णालये आणि नागरी आरोग्य केंद्रांमध्ये गोळ्या-औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांना बाहेरून गोळ्या आणायला सांगत असल्याची बातमी ‘सकाळ’ने दिली. या बातमीनंतर आयुक्त राजेश नार्वेकर यांनी महापालिका मुख्यालयात आरोग्य विभागाची तातडीची बैठक बोलावली आहे. अशातच मंगळवारी सकाळी गणेश नाईक यांनीदेखील शिष्टमंडळासोबत जाऊन आरोग्य, शिक्षण, भूखंड या विषयांवर नार्वेकर यांच्याशी चर्चा केली आहे. याप्रसंगी नाईकांनी अधिकाऱ्यांना आरोग्य विभागातील समस्यांवर लक्ष वेधताना लाखो रुपयांचा खर्च करूनही नवी मुंबईतील गोरगरिबांना औषधांसाठी पैसे भरावे लागत असल्याने तुमच्यात आणि खासगी रुग्णालयांमध्ये फरक काय, असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच आरोग्य विभागाची बैठक घेऊन हा प्रश्न तातडीने सोडवा, अशी मागणी केली आहे.
-------------------------------------
पाणीपुरवठ्यावरून लोकप्रतिनिधी नाराज
बेलापूरपासून दिघापर्यंतच्या सर्व नोडमध्ये पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे महापालिकेचे सर्व नगरसेवक नाराज असल्याची माहिती आमदार गणेश नाईक यांनी दिली. पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना अद्याप पाणीपुरवठ्याचे महत्त्व समजलेले नाही, परंतु नागरिकांना होणाऱ्या त्रासाची प्रशासनाला जाणीव नसल्याचे म्हटले आहे.
-------------------------------------
शिक्षण क्षेत्रावर भर देण्याची गरज
महापालिकेच्या मालकीची राज्यात पहिली इंग्रजी शाळा सुरू करण्याचे श्रेय नवी मुंबई महापालिकेला जाते. इंग्रजीची गरज पाहता, आगामी काळात प्रत्येक नोडमध्ये सर्व शाळा इंग्रजी करण्याची भूमिका आमदार गणेश नाईक यांनी व्यक्त केली. या शाळांमध्ये मराठी आणि हिंदी विषय सक्तीचे करू, गरज पडल्यास पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण देणारे महाविद्यालय आणि लॉ कॉलेज सुरू करण्याचे नियोजनही गरजेचे आहे.