पोलिसांचा गाडीला दे धक्का | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिसांचा गाडीला दे धक्का
पोलिसांचा गाडीला दे धक्का

पोलिसांचा गाडीला दे धक्का

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १६ : पोलिसांच्या ताफ्यात काही महिन्यांपूर्वी नव्या बोलेरो गाड्या सामील झाल्या आहेत. या गाड्यांचा वापर गस्तीसाठी करण्यात येतो. तसेच काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना या गाड्या देण्यात आल्या आहेत. मात्र, या गाड्यांमध्‍ये सतत बिघाड होत असल्याची बाब निदर्शनास येत आहे. कल्याण येथील पोलिसांच्या ताफ्यातील ही बोलेरो गाडी मंगळवारी बंद पडल्याने पोलिसांनाच या गाडीला धक्का मारावा लागल्याचे दिसून आले. गस्तीसाठी पोलिसांना मिळणारे वाहन असे कधीही बंद पडले तर गुन्हेगारांना पकडायचे कसे असा मोठा प्रश्न आता खुद्द पोलिसांसमोरच उभा राहिला आहे.
कल्याणमधील एका पोलिस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना गस्‍तीवर जायचे असताना त्यांची गाडी अचानक बंद पडली. खुद्द पोलिस कर्मचाऱ्यांनी गाडीला धक्का मारत वाहन चालू करण्याचा प्रयत्न केला; मात्र ते वाहन सुरू झाले नाही. याविषयी विचारणा केली असता पोलिस कर्मचाऱ्यांनी गाडीची बॅटरी खराब झाली असल्याचे सांगत अधिक बोलणे टाळले. मात्र, गस्तीसाठी मिळालेली नवीन वाहने वारंवार बंद पडत असल्याने पोलिसांच्या नाकी नऊ आल्याचे दिसून येते. नव्या गाड्यांच्या बॅटरीविषयी तक्रारी येत असून काही वाहनांच्या बॅटरी या कंपनीकडे दुरूस्तीसाठी पाठविण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गुन्हेगारांना पकडण्यासाठी अत्यावश्यक साधन म्हणून पोलिसांच्या ताफ्यातील वाहनांकडे पाहिले जाते. गस्तीसाठी वापरण्यात येणाऱ्या गाड्यांचीच धक्का स्टार्ट अवस्था असेल तर गुन्हेगार हाती कसे लागणार, असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.