डाळीला महागाईचा तडका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डाळीला महागाईचा तडका
डाळीला महागाईचा तडका

डाळीला महागाईचा तडका

sakal_logo
By

डोंबिवली, ता. १६ (बातमीदार) : परतीच्‍या पावसाचा मोठा फटका हा डाळीच्या उत्पादनाला बसला असून किमती वधारल्‍या आहेत. त्यामुळे डाळ खरेदी करणे हे सर्वसामान्यांच्या खिशाला जड जात आहे. तूर आणि उडीद डाळीच्या किमती या शंभरीच्या पार गेल्या असून, गोरगरीबांच्‍या जेवणात महत्त्‍वाचे स्‍थान असणाऱ्या डाळीला सध्‍या महागाईचा तडका बसल्‍याचे चित्र आहे.
दोन वर्षांनंतर निर्बंधमुक्त झालेल्या दिवाळीत डाळीची मागणी जास्त होती. त्या वेळी आवक तेवढी नसल्यामुळे डाळीच्या दरात वाढ झाली होती; मात्र दिवाळीनंतरदेखील डाळीचे दर ‘जैसे थे’च असल्याचे चित्र बाजारात आहे. परतीच्‍या पावसामुळे डाळीच्या पिकाचे नुकसान झाले; त्यामुळे पिकात पाच टक्के घट झाली आहे. परिणामी, डाळीच्या किमती वाढल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पादनाचा अंदाज कमी झाल्यामुळे, महाराष्ट्र आणि कर्नाटकसारख्या प्रमुख उत्पादक राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
उडीद डाळीच्‍या किमती १०० रुपये प्रतिकिलो पार गेलेली असून, तूर डाळ ही ९८ रुपये प्रतिकिलोच्या आसपास पोहोचली आहे. मूग डाळदेखील ९५ रुपये प्रति किलो असून, मसूर डाळ ही ७२ रुपये प्रतिकिलो आहे. मागील आठवड्याच्या दरम्यान या आठवड्यात डाळीच्या किमती या सहा ते सात रुपयांनी वाढलेल्या आहेत. या किमती अजून वाढण्याची शक्यता आहे, असे विक्रेता भुवन सिंग यांनी सांगितले.
--------------------------------
डाळीचे दर सध्याचे दोन महिन्यांपूर्वी
तूरडाळ ९५ ते १०५ ९० ते १००
मूगडाळ ९० ते ९५ ८० ते ८५
चणाडाळ ५७ ते ६० ५२ ते ५५
उडीदडाळ ९५ ते १०५ ९० ते ९५
मसूरडाळ ७८ ते ८० ७० ते ७२
-----------------------------------------
मटकीच्‍या दरात वाढ
सध्या मटकीचा हंगाम सुरू असतानादेखील मटकीचे दर वाढलेले आहे. तीन महिन्यांपूर्वी माल कमी येत असल्यामुळे मटकीचे दर १०० रुपये किलोपर्यंत पोहचले होते. त्यानंतर आवक वाढल्याने ६० रुपये किलोपर्यंत मटकीचे दर आले होते; पण मटकीचे दर कमी होऊ नये, यासाठी दलालांनी साठेबाजी केल्याने पुन्हा मटकीच्या दरात वाढ झाली आहे.