प्रीमियर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रीमियर
प्रीमियर

प्रीमियर

sakal_logo
By

अभिनेता मनोज वाजपेयीने केले खुशबूचे कौतुक
‘क्रिमिनल जस्टिस’ वेबसीरिजमध्ये अभिनेत्री खुशबू अत्रेने रत्ना नावाची भूमिका साकारली होती. तिला तेव्हा चांगलीच लोकप्रियता मिळाली. अभिनेते पंकज त्रिपाठी यांच्या पत्नीची भूमिका तिने साकारली आहे. त्या भूमिकेमुळेच आता तिला ‘कॅप्सूल गिल’ हिंदी चित्रपट मिळाला. त्यात ती अक्षय कुमार, परिणिती चोप्रा, अनंत महादेवन, रवी किशन आदी कलाकारांबरोबर काम करीत आहे. ‘क्रिमिनल जस्टिस’ सीरिजमध्ये तिने घेतलेल्या मेहनतीचे आता तिला फळ मिळत आहे. अभिनेता मनोज वाजपेयीने तिचा अभिनय पाहिल्यानंतर तिचे कौतुक केले. मनोज म्हटले आहे, ‘तुमचे ‘क्रिमिनल जस्टिस’मधील काम छान झाले आहे. तुमच्या भविष्यातील कामांना माझ्या शुभेच्छा.’ त्यावर खुशबू म्हणते, की मनोज सरांची मी नेहमीच फॅन राहिले आहे. त्यांच्यासारख्या कलाकारांकडून आम्हाला चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते. मला खूप शिकायचे आहे...

हृतिक रोशनने सुरू केले ‘फायटर’चे शूटिंग
‘फायटर’ चित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक त्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. चित्रपटाबद्दल आलेल्या एका नवीन अपडेटनुसार सुपरस्टार हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांनी आगामी ‘फायटर’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. ‘विक्रम वेधा’ला मिळालेल्या यशानंतर हृतिकने अखेर ‘फायटर’ चित्रपट हाती घेतला आहे. ‘फायटर’ची निर्मिती करणाऱ्या मार्फ्लिक्स प्रॉडक्शनने हृतिकसह दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदचा शूटिंगसाठी निघालेला एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे ‘आणि सुरुवात झाली... #FIGHTER.’ अलीकडेच, हृतिकने ‘विक्रम वेधा’त केलेल्या उत्कृष्ट कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याशिवाय ‘अल्कोहोलिया’ गाण्यातील त्याच्या नृत्यानेही सर्वांना वेड लावले आहे.

महाराष्ट्रातील ७० शाळांमधील विद्यार्थ्यांनी पाहिला ‘सुमी’
नुकताच बालदिन साजरा करण्यात आला आणि त्यानिमित्त ‘सुमी’ हा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट प्रदर्शित झाला. आपल्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी अनेक प्रकारे प्रयत्न करणाऱ्या जिद्दी ‘सुमी’चा रंजक प्रवास आता प्रेक्षकांना ‘प्लॅनेट मराठी’#ओटीटीवर पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट महाराष्ट्रातील सुमारे ७० शाळांमधील विद्यार्थ्यांनी पाहिला. शिक्षणाच्या ध्येयाने झपाटलेल्या ‘सुमी’ची भूमिका आकांक्षा पिंगळे हिने साकारली असून या चित्रपटात दिव्येश इंदुलकर, स्मिता तांबे, नितीन भजन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. अमोल वसंत गोळे दिग्दर्शित या चित्रपटाला रोहन यांचे संगीत लाभले आहे. ‘प्लॅनेट मराठी’चे संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ‘‘सुमी चित्रपट म्हणजे बालदिनानिमित्ताने आमच्याकडून बालदोस्तांसाठी खास भेट आहे. सिनेमा जरी बालदिनानिमित्ताने प्रदर्शित केला गेला असला तरी तो प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांनी पाहावा असाच आहे. बालदिनानिमित्ताने ‘सुमी’ चित्रपट शाळेत दाखवण्यात आला आणि तो महाराष्ट्रातील अनेक मुलांनी पाहिला, ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा चित्रपट पोहचावा, अशी आमची आशा आहे.’’ दिग्दर्शक अमोल गोळे म्हणतात, ‘‘बालदिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील शाळांनी विद्यार्थ्यांना ‘सुमी’ चित्रपट दाखवला. यामुळे अनेक मुलांपर्यंत हा चित्रपट पोहचला. आमच्यासाठी ही निश्चितच आनंदाची बाब आहे. अक्षय बर्दापूरकर आणि प्लॅनेट मराठी प्रस्तुत, हर्षल कामत एंटरटेन्मेंट व गोल्डन माऊस प्रॉडक्शन्स् निर्मित, ए. फोर. क्रिएशन्स सहनिर्मित, ‘सुमी’ चित्रपटाचे निर्माते हर्षल कामत, स्वाती एस. शर्मा आणि मिहिर कुमार शर्मा आहेत.

...आणि मला हसू आवरत नव्हतं : भाऊ कदम
दिग्दर्शक रवी जाधवचा ‘टाईमपास’ चित्रपट कमालीचा गाजला. त्यानंतर त्याचा दुसरा आणि तिसरा भाग आला. तिन्ही भागांना प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली. आता झी टॉकिजवर येत्या रविवारी तो प्रदर्शित होत आहे. चित्रपटात प्रथमेश परब, हृता दुर्गुळे, भाऊ कदम, संजय नार्वेकर आदी कलाकारांनी काम केले आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणावेळचा एक किस्सा भाऊ कदमने ऐकवला. भाऊ कदम म्हणाला, ‘‘टाईमपास ३ हा सिनेमा जितका प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा आहे, तितकाच आम्हा कलाकारांनाही तो शूट करताना मजा आली. सिनेमा पाहताना मला मी दाबून ठेवलेले हसू आठवते. या सिनेमात एक सीन आहे. पालवीचे वडील दिनकर पाटील, जे डॉन आहेत ते पालवीचे प्रेम दगडूवर आहे हे कळल्यावर शांतारामच्या घरी येतात. तेव्हा दगडू आणि पालवीच्या नात्याविषयी त्यांचे बोलणे सुरू होत असते. बोलताना दिनकर पाटील खिशातील पिस्तूल, सुरा असे एकेक हत्यार शांतारामसमोर काढून ठेवायला सुरुवात करतात. डॉन दिनकरची भूमिका करणारा संजय नार्वेकर हा सीन करत होता. त्याची ती भाईगिरीची भाषा, एकेक हत्यार समोर ठेवत बोलणे हे बघून खरं तर शांतारामला घाबरायचे होते; पण माझ्यातील भाऊ हसायचे काही थांबेना. तो अख्खा सीन होईपर्यंत मी हसत होतो. जेव्हा कॅमेरा संजयकडे असायचा तेव्हा समोर मला हसू फुटत होते. कॅमेरा माझ्याकडे आला की तेवढ्या वेळापुरता मी गंभीर लूक द्यायचो. आमचा हा सीन असा शूट झालाय.’’