अनुदान बंद झाल्याने १२५० विद्यार्थी प्रवाहाबाहेर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनुदान बंद झाल्याने १२५० विद्यार्थी प्रवाहाबाहेर
अनुदान बंद झाल्याने १२५० विद्यार्थी प्रवाहाबाहेर

अनुदान बंद झाल्याने १२५० विद्यार्थी प्रवाहाबाहेर

sakal_logo
By

शहापूर, ता. १५ (बातमीदार) : शासकीय अनुदान मिळाल्याने तालुक्यातील एकात्मिक आदिवासी प्रकल्पातील आठ नामांकित शाळा आदिवासी विद्यार्थ्यांसाठी बंद झाल्या आहेत. शासनाच्या या बेफिकीर धोरणामुळे या नामांकित शाळेत शिक्षण घेणाऱ्या पहिली ते बारावीच्या १२५० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने पालक चिंताग्रस्त आहेत. याबाबत तातडीने अनुदान उपलब्ध करण्याची मागणी केली जात आहे.
शहापूरच्या एकात्मिक आदिवासी प्रकल्पांतर्गत तालुक्यात आठ नामांकित शाळांमधून शासकीय निकषानुसार पात्र आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व शारीरिक गरजेनुसार प्रतिविद्यार्थी ७० हजार रुपये शासनाकडून देण्यात येतात; मात्र कोविड महामारीच्या काळात शाळा बंद असल्याने शासनाने २०२१-२२ या आर्थिक वर्षात केवळ २५ टक्के तर २०२२-२३ या आर्थिक वर्षात अवघे ३० टक्के अनुदान दिले आहे. शासनाकडून उर्वरित अनुदान रखडल्याने या नामांकित शाळा आदिवासी विद्यार्थ्यांसाठी थेट बंदच करण्यात आल्या आहेत. दिवाळीची सुट्टी संपली तरीही या शाळा सुरू न झाल्याने पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
दिवाळीनंतर ९ नोव्हेंबरपासून राज्यात शाळा सुरू झाल्या आहेत; मात्र शासकीय अनुदान रखडल्याने प्रकल्पांतर्गत प्रवेश घेतलेल्या निवासी विद्यार्थ्यांना शाळेत समाविष्ट करून घेण्यात आले नाही. यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खोळंबा होत आहे. याबाबत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने शासनाने तातडीने अनुदान उपलब्ध करून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणावे, अशी मागणी सह्याद्री आदिवासी संघटनेचे माहुली विभागीय अध्यक्ष नारायण केवारी यांनी केली आहे.

...........................................
इतके विद्यार्थी घेतात शिक्षण
शहापूर एकात्मिक आदिवासी प्रकल्पांतर्गत शहापूर तालुक्यातील आत्मामलिक इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये २३४, आत्मामलिक इंटरनॅशनल स्कूलमध्ये ३११, कर्जत तालुक्यातील माथेरान व्हॅली इंग्लिश मीडियम नेरळमध्ये सात, पनवेल येथील ब्रांस स्कूलमध्ये ८१, कल्याण येथील डी. एस. डी स्कूलमध्ये ३५४, नाशिक त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्म व्हॅली इंग्लिश मीडियममध्ये १२९, पुणे जुन्नर तालुक्यातील श्री जे. आर. गंजाळ इंग्लिश मीडियम स्कूल आळेफाटा येथे ४५; तर सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील स्कॉलर फाऊंडेशन हायस्कूल पाचगणी येथील ८९ असे एकूण १२५० अनुसूचित जमातीचे विद्यार्थी या शाळांमध्ये शासकीय मदतीने शिक्षण घेत आहेत.

.......................
नामांकित शाळांच्या शुल्काच्या प्रश्नाबाबत शासन स्तरावर निर्णय होणार आहे. शहापूर प्रकल्प कार्यालयाकडून या शाळांना संबंधित विद्यार्थ्यांना लगेच बोलावून घ्यावे आणि त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देऊ नये असे सांगण्यात आले आहे.
- रंजना किल्लेदार, शहापूर प्रकल्प अधिकारी