राज्यात आदिवासींच्या हिताचे निर्णय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यात आदिवासींच्या हिताचे निर्णय
राज्यात आदिवासींच्या हिताचे निर्णय

राज्यात आदिवासींच्या हिताचे निर्णय

sakal_logo
By

जव्हार, ता. १६ (बातमीदार) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यात आदिवासींच्या हिताचे निर्णय घेण्यात आले आहेत. पालघर जिल्ह्यातील आदिवासी जनतेसाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध राहू, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे आयोजन जव्हार शहरातील राजीव गांधी स्टेडियम येथे करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार राजेंद्र गावित, विक्रमगड विधानसभेचे आमदार सुनील भुसारा आदी मान्यवर उपस्थित होते. राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून आपल्या महाराष्ट्रामध्ये जनजाती आयोग हा निश्चितपणे केला जाईल. या माध्यमातून आदिवासी समाजाला न्याय देण्याच्या दृष्टीने ही कार्यवाहीदेखील निश्चितपणे केली जाईल. आदिवासी संशोधन टीआरटीआय या संस्थेच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांच्या पीएचडीचा जो प्रश्न आहे, तो प्रश्न सोडवला जाईल. आदिवासी विद्यार्थ्यांना पीएचडी करण्याकरता अनुदान हे टीआरटीआयच्या माध्यमातून दिले जाईल, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

...................................
जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करणार
आपण मुख्यमंत्री असताना पालघर जिल्ह्याला मुख्यालय मंजूर करून त्या मुख्यालयाचे बांधकाम करवून घेतले. त्याच ठिकाणी आपण पालघर जिल्हा रुग्णालयाची जागादेखील ठेवलेली आहे. याच्या टेंडरचेही काम लवकरच होणार आहे. जिल्ह्यात जिल्हा रुग्णालयासह वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना करायची आहे. त्या संदर्भातील पुढची व्यवस्था देखील होताना आपल्याला निश्चितपणे दिसेल. आम्ही सत्तेवर असताना जव्हार, मोखाड्यातील कुपोषण कमी केले होते. गेल्या दोन वर्षांत ते पुन्हा वाढलेले दिसून येत आहे. यासाठी पुन्हा आपल्याला जोमाने काम करावे लागणार आहे.