इंडियनऑईलचा पर्यावरणपूरक गणवेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंडियनऑईलचा पर्यावरणपूरक गणवेश
इंडियनऑईलचा पर्यावरणपूरक गणवेश

इंडियनऑईलचा पर्यावरणपूरक गणवेश

sakal_logo
By

नवी दिल्ली, ता. १६ : इंडियन ऑईलने आपल्या कामगारांसाठी टाकून दिलेल्या पीईटी बाटल्यांपासून बनवलेला पर्यावरणपूरक गणवेश सादर केला आहे. यासाठी ४०५ टन पीईटी बाटल्यांचा पुनर्वापर करण्यात येईल. या उपक्रमामुळे वातावरणात कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन कमी होण्यास मदत होईल.
इंडियन ऑईलच्या ‘अनबॉटल : टुवर्डस् अ ग्रीनर फ्युचर’ या समारंभात इंडियन ऑइलचे अध्यक्ष एस. एम. वैद्य यांनी या गणवेशाचे अनावरण केले. या गणवेशाचे वाटप इंडियन ऑइल आणि इंडेनच्या जवळपास तीन लाख कर्मचाऱ्यांमध्ये करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे सुमारे ४०५ टन पीईटी बाटल्यांच्या पुनर्वापर शक्य होईल. दरवर्षी २० दशलक्ष बाटल्यांता वापर करण्यात येईल. याप्रसंगी अभिनेत्री आणि पर्यावरण कार्यकर्त्या भूमी पेडणेकर या उपस्थित होत्या.
याप्रसंगी बोलताना एस. एम. वैद्य म्हणाले, ‘दरवर्षी सुमारे ८ दशलक्ष मेट्रिक टन प्लास्टिक समुद्रात प्रवेश करते. आपल्या सागरी परिसंस्थांमध्ये १५० दशलक्ष मेट्रिक टन प्लास्टिक वाहून जाते. या गतीने २०५० पर्यंत, समुद्रात माशांपेक्षा अधिक प्लास्टिक असेल. या प्लास्टिकच्या बाटल्यांचे फॅब्रिकमध्ये रूपांतर करणे हे नवीन संधींचे दरवाजे कसे उघडतात याचे एक सुंदर उदाहरण आहे’ तर या वेळी उपस्थित असलेल्या भूमी पेडणेकर इंडियन ऑइलच्या उपक्रमाचे कौतुक करताना म्हणाल्या, ‘आपल्यापैकी प्रत्येकजण जीवनाचा मार्ग म्हणून शाश्वततेचा स्वीकार करून महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो. देशाचा नागरिक म्हणून मला अभिमान वाटतो, की देशातील आघाडीची ऊर्जा कंपनी असा पर्यावरणपूरक उपक्रम राबवत आहे. या प्रयत्नासाठी मी इंडियन ऑइलचे आभार व्यक्त करते.’

-------------
प्लास्टिकपासून कपड्यांची निर्मिती
इंडियन ऑईलच्या या ग्रीन उपक्रमांतर्गत, वापरलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांचे तुकडे करून ते वितळवले जातात. यातून निर्मित सूक्ष्म गोळ्यांचे यार्नमध्ये रूपांतर केले जाते. यापासून मिळालेल्या फॅब्रिकपासून कपड्यांची निर्मिती केली जाते. याच्या उत्पादनासाठी ६० टक्के कमी ऊर्जा लागते. यामुळे वातावरणात कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन जवळजवळ एक तृतीयांश कमी होते.