टिटवाळ्यात प्रवाशांचा रेल रोको | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टिटवाळ्यात प्रवाशांचा रेल रोको
टिटवाळ्यात प्रवाशांचा रेल रोको

टिटवाळ्यात प्रवाशांचा रेल रोको

sakal_logo
By

टिटवाळा, ता. १६ (बातमीदार) : पावसाळ्यानंतर सुरू झालेली दुरुस्तीची कामे, लोकल सेवा रखडवून एक्स्प्रेस-मालगाड्यांना वारंवार दिले जाणारे प्राधान्य यामुळे मध्य रेल्वेच्या कसारा मार्गावरील अप-डाऊन वाहतूक दररोज किमान १५ ते २० मिनिटे उशिराने धावते. याबाबत वारंवार तक्रार करूनही रेल्वे प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने आज सकाळी टिटवाळा रेल्वे स्थानकात प्रवाशांचा उद्रेक पाहायला मिळाला. दररोज लेटमार्क लागत असल्याने संतप्त प्रवाशांनी रेल्वे रुळावर उतरून निषेध केला. यामुळे वाहतूक विस्कळित होऊन प्रवाशांची अधिक गैरसोय झाली.

कल्याण-कसारा रेल्वे मार्गावरील अप-डाऊन लोकल वाहतूक गेले महिनाभर उशिराने धावत आहे. त्यातच टिटवाळ्याला सकाळी ८.१९ ला कसाऱ्याहून येणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे (सीएसएमटी) लोकलही दररोज उशिराने धावते. विशेषतः शहाड स्थानक सोडल्यानंतर ही लोकल गेले काही दिवस अधिक वेळ रखडत आहे. परिणामी, ही लोकल पुढे २० ते ३० किंवा त्याहून अधिक उशिराने धावते. त्यामुळे प्रवाशांच्या संतापात आजूनच भर पडत आहे. परिणामी, बहुतांश नोकरदार वर्गाला कामाच्या ठिकाणी ‘लेटमार्क’ सहन करावा लागतो.

लोकल विलंबाबाबत स्टेशन मास्तर, ट्विटरद्वारे वारंवार तक्रार करूनही दखल घेतली जात नाही. नेहमीप्रमाणे आजही ही लोकल उशिराने येत असल्याची उद्‍घोषणा स्थानकावर होताच संतप्त झालेल्या प्रवाशांनी थेट रुळावर उतरून रेल रोको केला. ही लोकल दररोज उशिराने धावते. दररोज उशिराचे रडगाणे आम्ही सहन करणार नाही, असे सांगत प्रवाशांनी तिन्ही रेल्वे मार्ग रोखून धरले. परिणामी अप आणि डाऊन लोकल वाहतूक विस्कळित झाली. टिटवाळा स्थानकाचे प्रबंधक पी. आर. भगत यांनी पुढील कालावधीत लोकलसेवा सुरळीत ठेवू आणि लोकल वेळेवर जाईल, अशी लेखी हमी दिल्यानंतर प्रवाशांनी आंदोलन मागे घेतले.

एसी लोकलने संतापात भर
टिटवाळा स्थानकातून सीएसएमटीसाठी सकाळी ८.३३ ला वातानुकूलित (एसी) लोकल धावते. ही लोकल सामान्य असताना ती बहुतांश प्रवाशांना सोयीची होती, परंतु तीन महिन्यांपूर्वी सदर लोकल एसी केल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. नोकरदार वर्ग शिवाय दररोज भाजीपाला आणण्यासाठी कल्याणला जाणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांची या लोकलमुळे मोठी रखडपट्टी होते. परिणामी या प्रवाशांना ८.१९ च्या लोकलनेच जावे लागते. एसी लोकलच्या विरोधात प्रवाशांनी अनेकदा प्रशासन, लोकप्रतिनिधींकडे तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने प्रवासी संताप व्यक्त करीत आहेत.

टिटवाळा स्थानकात येणाऱ्या व जाणाऱ्या उपगरी रेल्वे गाड्या रोजच अनियमित वेळेत धावतात. गेल्या महिनाभरापासून हा विलंब सुरू असल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत. वारंवार तक्रार करूनही रेल्वे प्रशासन या समस्येकडे लक्ष देत नाही.
- विजय देशेकर, उपाध्यक्ष, रेल्वे प्रवासी संघटना