नगरविकास विभागाच्या अडीच हजार फाईल्स धूळखात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नगरविकास विभागाच्या 
अडीच हजार फाईल्स धूळखात
नगरविकास विभागाच्या अडीच हजार फाईल्स धूळखात

नगरविकास विभागाच्या अडीच हजार फाईल्स धूळखात

sakal_logo
By

मुंबई, ता. १६ : ठाकरे सरकार पायउतार झाल्यानंतर तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील नगरविकास खात्याच्या ‘निर्णय न झालेल्या’ तब्बल अडीच हजार फाईल्स जवळपास तीन महिने मूळ नगरविकास विभागाकडे हस्तांतरितच झाल्या नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अडीच हजार फाईल्स म्हणजे जवळपास एक मोठी खोली भरेल इतक्या आहेत. अखेर सप्टेंबरमध्ये तत्कालीन मंत्री कार्यालयातील विशेष कार्य अधिकाऱ्याने नगरविकास विभागाच्या (१) अप्पर मुख्य सचिवांना पत्र पाठवून यासंदर्भात आठवण करून दिली.
उद्धव ठाकरे यांनी २९ जून २०२२ रोजी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर १० जुलै २०२२ रोजी सामान्य प्रशासन विभागाने पत्राद्वारे सर्व मंत्र्यांकडील मंत्रालयीन आस्थापनांना त्यांच्याकडील कागदपत्रे, नोंदवह्या, फाईल्स इत्यादी सर्व मूळ विभागांकडे परत करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तथापि तत्कालिन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हेच नूतन मुख्यमंत्री म्हणून नियुक्त झाल्याने आणि त्यांच्याकडेच नगरविकास विभागाचा कार्यभार राहणार असल्यामुळे मंत्री कार्यालयाने ‘निर्णय न झालेल्या’ या सर्व धारिका स्वतःकडे राखून ठेवाव्यात. मूळ विभागाकडे म्हणजे नगरविकास विभागाकडे परत न करण्याचा धोरणात्मक, पण तोंडी निर्णय घेतला होता. याबाबत नगरविकास विभागाचे (१) अपर मुख्य सचिव यांचे खासगी सचिव व इतर संबंधित यांना ही माहिती देण्यात आली होती, असे पत्रात नमूद केले आहे. त्यानुसार, तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे तत्कालीन विशेष कार्य अधिकारी तथा उपसंचालक प्र. ल. गोहिल यांच्याकडे या फाईल्स होत्या. नूतन मुख्यमंत्री कार्यालयात जुन्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्याही सेवा कायम राहणार आहेत, असे सांगण्यात आल्यामुळे त्यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी आजही मुख्यमंत्री कार्यालयात कार्यरत आहेत. तथापि, अद्यापही गोहिल यांची मुख्यमंत्री कार्यालयात नियुक्ती प्रशासकीय आदेशाच्या प्रतीक्षाधिन आहे.
---
‘अर्थ’पूर्ण फाईल्स खासगी व्यक्तीकडे?
प्र. ल. गोहिल हे त्यांच्या मूळ नियुक्तीच्या कार्यालयात रुजू व्हावे किंवा कसे, या द्विधा मनस्थितीत आहेत. त्यामुळे प्रशासकीय कामकाजाच्या हिताच्या दृष्टीने त्यांच्याकडील या प्रलंबित फाईल्स सद्यस्थितीत कोणाकडे हस्तांतरित कराव्यात, याबाबत आदेश द्यावेत, अशी विनंती गोहिल यांनी नगरविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. तब्बल ३ महिन्यांहून अधिक काळ सुमारे अडीच हजार फाईल्स मूळ विभागांकडे परत न केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे यापैकी काही महत्त्वाच्या ‘अर्थपूर्ण’ फाईल्स एका मोठ्या खासगी व्यक्तीकडे होत्या, अशी चर्चा रंगली आहे.