शासकीय वसतिगृहात घुसखोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शासकीय वसतिगृहात घुसखोरी
शासकीय वसतिगृहात घुसखोरी

शासकीय वसतिगृहात घुसखोरी

sakal_logo
By

मुंबई, ता. १६ : उच्च शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या मातोश्री शासकीय (मुलांचे) वसतिगृहात माजी विद्यार्थ्यांच्या घुसखोरीवरून अनेकदा चर्चा सुरू होती; मात्र गेल्या काही वर्षांपासून या वसतिगृहामध्ये माजी मंत्र्यांचे पीए, उच्च शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते थेट शिपायानेही घुसखोरी केली आहे. या घुसखोरांना वसतिगृहाच्या वॉर्डनपासून ते उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांकडे ओएसडी असलेल्या अधिकाऱ्यांचेच पाठबळ मिळत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
चर्चगेट येथे मोक्याच्या ठिकाणावर असलेल्या मातोश्री शासकीय वसतिगृहात घुसखोरी करणाऱ्यांची यादीच समोर आली आहे. त्यात विद्यार्थ्यांव्यतिरिक्त एल्फिन्स्टन महाविद्यालय आणि विज्ञान संस्थेतील प्रत्येकी एक अधीक्षक, न्यायवैद्यक शास्त्रातील प्राध्यापक आणि उच्चशिक्षण विभागातील दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. शिवाय, मंत्रालयातील एसएलओ पदावरील अधिकारी, मुंबईतील शासकीय विधी महाविद्यालय आणि इस्माईल युसूफ महाविद्यालयातील प्रत्येकी एका शिपायाने मातोश्री वसतिगृहात घुसखोरी केली आहे; तर दुसरीकडे माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत याच्या पीएच्या नावानेही एक जण राहत असून या सर्व महाठगांना वसतिगृहाबाहेर काढण्यासाठी उच्च शिक्षण विभागाची डोकेदुखी वाढली आहे. सध्या त्यांच्यावर कारवाई सुरू करण्यात आली असली, तरी त्यांचा वॉर्डनपासून ते मंत्रालयात ओएसडी असलेल्या अधिकाऱ्यांकडून बचाव केला जात असल्याने विभागाची गोची होत असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
----
टाळे तोडण्याचाही प्रकार
दरम्यान, मातोश्रीमध्ये अनधिकृत राहत असलेल्या विद्यार्थ्यांना विभागाकडून नोटिसा पाठवण्यात आल्या असल्या तरी काही विद्यार्थ्यांनी तर थेट विभागाच्याच विरोधात नोटीस पाठवली आहे. ज्या खोल्यांना टाळे लावण्यात आले, त्यातील काहींचे टाळे तोडण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले; मात्र त्यासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई का केली जात नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.