Sugar-Apple : गोल्डन सीताफळांचा बाजारात घमघमाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sugar-Apple
गोल्डन सीताफळांचा बाजारात घमघमाट

Sugar-Apple : गोल्डन सीताफळांचा बाजारात घमघमाट

वाशी : रंगाने पांढरी-पिवळसर आणि चवीला गोड असणाऱ्या गोल्डन सीताफळांची कृषी उत्पन्न बाजार समितीतील फळबाजारात आवक सुरू झाली आहे. परतीच्या पावसामुळे काही सीताफळांना कीड लागल्‍याने त्‍यांना हवा तसा दर मिळत नसल्याने दर घसरले आहेत. त्यामुळे एरवी १०० ते १५० रुपये किलोने विकली जाणारी सीताफळे ३० ते ६० रुपये किलोवर आली आहेत.

बाजारात गावठी, देशी सीताफळांचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे, तर गोल्डन सीताफळांची आवक सुरू झाली आहे. हे सीताफळ दिसायला आकर्षक आणि आकाराने मोठी आहेत. चवीला गोड असलेले एक सीताफळ पाव ते अर्धा किलो वजनात भरते; मात्र जास्त पिकल्यास लवकर खराब होते. त्यामुळे ठराविक वेळेतच ती खावी लागतात.
तीन-चार वर्षांपासून बााजारात गोल्‍डन सीताफळे मोठ्या संख्येने येऊ लागली आहेत. परतीच्या पावसाने सीताफळांना किड लागल्‍याने कीटकनाशक फवारणी करावी लागली. त्‍यामुळे बाहेरून जरी सीताफळ चांगले दिसत असले, तरी आतून खराब निघत असल्‍याने ग्राहकांकडून हवी तशी खरेदी होताना दिसत नाही.

आवक जास्‍त; मात्र उठाव कमी असल्‍याने गोल्‍डन सीताफळांचे दर निम्‍म्‍याहून कमी झाले आहेत. त्‍यात पावसाचा फटका बसल्‍याने सीताफळांना किड लागली आहे. हे फळ नाशवंत असल्‍याने सध्या बाजारात ३० ते ६० रुपये किलो दर मिळतो आहे.
- राहुल हांडे, फळव्यापारी

गोल्डन सीताफळांचे वैशिष्ट्य
गोल्डन सीताफळ अन्य जातींच्या सीताफळांपेक्षा मोठे, दिसायला आकर्षक आणि चवीला मधुर असते. गोल्डन सीताफळात बिया कमी असतात. झाडावरून या जातीचे सीताफळ पडले, तरी त्याचे नुकसान होत नाही. फळ झाडावर पंधरा दिवस आणि काढणी केल्यानंतर साधारणपणे आठवडाभर टिकते. अन्य जातीच्या सीताफळात गर तीस ते पस्तीस टक्के असतो. गोल्डन सीताफळात गराचे प्रमाण पन्नास टक्के असते.

सीताफळाचे दर प्रतिकिलो रुपयांत
महिनाभरापूर्वी - १०० ते १५०
सध्याचे - ३० ते ६०