अखेर तामसई पोचाडेला जलसंजीवनी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अखेर तामसई पोचाडेला जलसंजीवनी
अखेर तामसई पोचाडेला जलसंजीवनी

अखेर तामसई पोचाडेला जलसंजीवनी

sakal_logo
By

बोईसर, ता. १७ (बातमीदार) : जल-जीवन मिशन योजनेअंतर्गत पोचाडे-तामसई नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्याने आता या गावाचा पाणी प्रश्न सुटणार आहे. या योजनेला दोन महिन्यांपूर्वी हिरवा कंदील मिळला असून दोन कोटी ६२ लाख ८० हजार १५० रुपयांचे काम ठेकेदाराला देण्यात आले. पाणीपुरवठा योजनेमुळे गावातील सर्व कुटुंबांना नळजोडणीद्वारे पिण्यासाठी आवश्यक पाणी मिळणार आहे. पण हे काम लवकरात लवकर सुरू करावे जेणेकरून उन्हाळ्यात पाणीप्रश्न सुटेल, असे तामसई पोचडे ग्रामस्थांनी ग्रामसभेत सांगितले.
तामसई पोचाडे हे एक हजार लोकवस्तीचे गाव एकूण ८ पाडे असलेल्या गावात असलेल्या सहा विहिरींनी आताच तळ गाठला आहे. मागील १३ वर्षांपूर्वी उभारण्यात आलेला जलकुंभ कोरडेठाक असून त्याची पाईपलाईन देखील गंजून नादुरुस्त झाली. त्यामुळे ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पण आता या गावासाठी जल-जीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्याने या गावाचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
तामसई पोचाडे गावात २०१० मध्ये फक्त एका टाकीचे जलकुंभ तयार केले होते. परंतु पाणी नसल्याने हे जलकुंभ १३ वर्षांपासून कोरडेठाक आहे. तसेच पाणीपुरवठा योजनेसाठी पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या विहिरींमध्येही पाणी नसल्याने जलकुंभ धुळखात आहे. याबाबत तामसई येथील महिलांनी आक्रमक होत मोर्चा काढला होता. तरीही या ग्रामस्थांची पाण्यासाठीची वणवण कायम आहे. पण नव्याने मंजूर झालेल्या या पाणीपुरवठा योजनेमुळे ग्रामस्थांना दिलासा मिळणार आहे. पण हे काम लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.

अशी आहे पाणीपुरवठा योजना
पोचाडे जुनी टाकी दुरुस्तीमुळे एक लाख लिटर पाणीसाठा
तामसई २० हजार लिटरची जुनी टाकी दुरुस्ती करून वापरात
गावदेवी मंदिर येथे नव्याने ४५ हजार लिटरची टाकी

नळजोडणी -
बहाडोली - पोचाडे - तामसई मुख्य पाईपलाईन : ८१ लाख
तामसई गावठाण व पाडे जोडणी : २७ लाख
पोचाडे सर्व पाडे जोडणी : १५ लाख

पाणी पुरवठा योजनेचे काम या आठवड्यात काम करण्याच्या ठेकेदाराला सूचना दिलेल्या आहेत त्यांनी काम त्वरित चालू करावे.
- गंगाधर निवडुंगे, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद
....
या महिन्यात काम चालू करण्याचे प्रयत्न आहेत. लवकरच कामाचा शुभारंभ केला जाईल.
- पंकज पाटील, सबठेकेदार, कार्तिकेय इंफास्ट्रक्चर
....
तामसई- पोचाडे गावात गेले १२ वर्षांपासून पाणीटंचाई आहे. आता मंजूर नळपाणीपुरवठा योजनासाठी पंचायत समिती जिल्हा परिषद पाठपुरावा केला आहे. लवकरच या कामाचा शुभारंभ करून गावातील पाणी प्रश्न सोडवण्यास प्रयत्न असेल.
- सानवी पाटील, समाजसेविका, तामसई
...
ग्रामपंचायत ठराव करून वसई विरार महापालिका परवानगी आणली आहे. या गावातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. तसेच या पाणीपुरवठा योजनेमुळे महिलांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबणार आहे.
- प्रगती प्रमोद पाटील, सरपंच पोचाडे तामसई

...
मंजूर झालेल्या नळ पाणी पुरवठा योजनेसाठी शाश्वत व मुबकल जलस्रोत उपलब्ध असल्याने योजना यशस्वी होईल. यामुळे गावातील पिण्याचा पाण्याचा मोठा प्रश्न मार्गी लागेल.
शशिकांत ठाकरे, ग्रामसेवक