मुंबई-ठाणे वाहतुकीची होणार कोंडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई-ठाणे वाहतुकीची होणार कोंडी
मुंबई-ठाणे वाहतुकीची होणार कोंडी

मुंबई-ठाणे वाहतुकीची होणार कोंडी

sakal_logo
By

ठाणे, ता. १७ (वार्ताहर) : ठाणे आणि मुंबई शहराला जोडणारी तसेच राज्य महामार्गाला संलग्न असलेल्या मुख्य वाहिनीचा अत्यंत महत्त्‍वाचा कोपरी पूल येत्या शनिवार-रविवारी वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. कोपरी पुलावर ६३ मीटर लांबीचे ११० टनाचे सात गर्डर टाकण्यासाठी रात्री ११ ते सकाळी ६ दरम्यान वाहतूक बंद राहणार आहे. या कालावधीत या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर कंटेनरसह अवजड वाहतूक होत असते. अन्य वाहनांसह अवजड वाहनांनाही पर्यायी मार्गाची व्यवस्था वाहतूक विभागाने केली असली तरी या दोन दिवसांच्या कालावधीत खारेगाव टोलनाका, कळवा-विटावा, मॉडेला चेकनाका आदी ठिकाणी वाहतूक कोंडी उद्भवण्याची शक्यता आहे.
पूर्व द्रुतगती महामार्गावरील मुंबई आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या कोपरी पुलावरून दररोज ठाणे, भिवंडी, नाशिक, घोडबंदर येथून हजारो वाहने मुंबई तसेच ऐरोलीच्या दिशेने वाहतूक करत असतात. कोपरी पुलावरून ठाण्याकडे आणि ठाण्याकडून मुंबईकडे, नवी मुंबईकडे जाणाऱ्या जड आणि अवजड हजारो वाहनांची संख्या आहे, परंतु हा पूल वाहतुकीसाठी अत्यंत अरुंद असल्याने तसेच जीर्ण झाल्याने २०१६ मध्ये पुलाच्या रुंदीकरण आणि पुनर्बांधणीसाठी प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर एमएमआरडीए आणि रेल्वे प्रशासनाने २०१८ मध्ये पहिल्या टप्प्याच्या कामास सुरुवात केली. तेव्हापासून आतापर्यंत गर्डर बसवण्यासाठी दोन वेळा हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.
आता गर्डर टाकण्यासाठी १९ ते २० नोव्हेंबर हे दोन दिवस निवडण्यात आले आहे. त्यासाठी रात्री ११ ते सकाळी ६ या पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. वाहतूक खोळंबा होऊ नये यासाठी वाहतूक विभागाने पर्यायी मार्ग दिले आहेत, पण तरीही वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मॉडेल तीन हात नाका, जड वाहनांमुळे खारेगाव टोलनाका, नवघर पूर्व-पश्चिम पूल, एसीसी सिमेंटमार्ग हे अरुंद रस्ते असल्याने वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. संभाव्य ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ठाणे आणि मुंबई वाहतूक विभाग संयुक्तरीत्या वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.

सहकार्यासाठी आवाहन
वाहतूककोंडी निर्माण होऊ नये यासाठी ठाणे शहर वाहतूक विभागाचे उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी तीन हातनाका परिसरात दौरा करून पाहणी करून ठाणेकरांना सहकार्याचे आवाहन केले आहे.

असा करा प्रवास
जड-अवजड वाहने
१) नाशिक-मुंबई महामार्गाने कोपरी पुलावरून मुंबईच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहने खारेगाव टोलनाका येथून गॅमन चौक-पारसिक रेती बंदर, मुंब्रा बाह्यवळण, शिळफाटा, महापेमार्गे रबाळे-ऐरोली, मुंबई पूर्व द्रुतगती मार्गाने इच्छितस्थळी जातील.
२) घोडबंदर मार्गाने कोपरी पुलावरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना माजीवाडा पुलावरून उजवे वळण घेण्यास व माजीवडा पुलाखाली प्रवेशबंद करण्यात येत आहे. ही वाहने तत्त्वज्ञान सिग्नलपुढे माजीवाडा पुलावरून खारेगाव टोलनाका येथून डावीकडे वळण घेऊन गॅमन चौक, पारसिक रेती बंदर, मुंब्रा बाह्यवळण, शिळफाटा, महापेमार्गे रबाळे-ऐरोली, मुंबई पूर्व द्रुतगती मार्गाने इच्छितस्थळी जातील.
३) मुंबई पूर्व द्रुतगती महामार्गाने ठाणे शहराकडे येणारी जड-अवजड वाहने ही ऐरोली पूल, नवी मुंबई मार्गे इच्छित स्थळी जातील.

हलकी वाहने
१) नाशिक तसेच घोडबंदर मार्गाने आणि ठाणे शहरातून पूर्व द्रुतगतीमार्गे मुंबईच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या हलक्या वाहनांना तीन हात नाका पूल येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. शहरातील वाहने टपाल कार्यालय, ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृह मार्ग, कळवा-विटावा-ऐरोली मार्गे पूर्व द्रुतगती मार्गाने इच्छितस्थळी जातील.
२) घोडबंदर मार्गे आणि ठाणे शहरातून मुंबईच्या दिशेने वाहतूक करणारी वाहने तीन हात नाका येथून उजवीकडे वळण घेऊन एलबीएस मार्गे, मॉडेला चेक नाका येथून इच्छितस्थळी जातील.
३) घोडबंदर मार्गे आणि ठाणे शहरातून मुंबईच्या दिशेने वाहतूक करणारी वाहने तीन हात नाका, तुळजा भवानी मंदिर सेवा रस्ता, बारा बंगला, बालनिकेतन शाळा, आनंदनगर चेक नाका मार्गे मुंबईत जातील. मुंबई येथून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनांना कोपरी पुलावरून प्रवेशबंदी आहे.
४) मुंबई पूर्वद्रुतगती महामार्गाने ठाणे शहराकडे येणारी हलकी वाहने कोपरकर चौक, सोन चौक येथून उजवीकडे वळन घेऊन एल. बी. एस. मॉडेला चौक, तीन हात नाकामार्गे इच्छितस्थळी जातील.