सामुहिक पाणी बिलांचा सदनिकाधारकांना ताप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सामुहिक पाणी बिलांचा सदनिकाधारकांना ताप
सामुहिक पाणी बिलांचा सदनिकाधारकांना ताप

सामुहिक पाणी बिलांचा सदनिकाधारकांना ताप

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १७ : महापलिका हद्दीतील इमारतींना सामूहिक पद्धतीने पाणी बिले महापालिकेकडून पाठवण्यात येत असतात; मात्र इमारतीतील अनेक सदनिकाधारक हे वेळेवर पैसे जमा करत नसल्याने त्याचा भुर्दंड सोसायटीला सहन करावा लागत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अनेकदा पाणी बिलाची रक्कम पालिकेकडे भरली जात नसल्याने नळजोडणी खंडितच्या कारवाईला सामोरे जावे लागण्याची वेळ ओढवत असून त्याचा नाहक त्रास इतर सदनिकाधारकांना सोसावा लागत असल्याची बाब समोर आली आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रातील नळजोडण्यांवर बसवण्यात आलेल्या पाणी मीटरद्वारे बिले पाठवण्यात येत आहेत; मात्र ही बिले चुकीची असल्याच्या तक्रारी गेल्या काही दिवसांपासून पुढे येत आहेत. दुसरीकडे इमारतींना सामूहिक पाणी बिल पाठवण्यात येत असल्याने त्याचा फटका सोसायटी समितीकडे वेळेवर पैसे जमा करणाऱ्या सदनिकाधारकांना बसत असल्याचे दिसून येत आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील चाळी आणि झोपडपट्टी भागात ठोक पद्धतीने पाणी देयके आकारली जात होती. शहरातील इमारतींमध्ये घरांच्या क्षेत्रफळानुसार पाणी देयकांची आकारणी केली जात होती. इमारतींमधील प्रत्येक सदनिकाधारकांना वैयक्‍तिक देयक येत होते. त्यामुळे ज्या सदनिकाधारकांचे पाणी देयक भरले जात नव्हते, त्यांच्यावरच दंडात्मक किंवा नळजोडणी खंडितची कारवाई केली जात होती, परंतु जलमापके बसवल्यानंतर पालिका प्रशासनाने वैयक्तिकऐवजी इमारतींना सामूहिक देयके पाठवण्यास सुरुवात केली असून या सामूहिक देयकांच्या पद्धतीमुळे वेळेवर सोसायटीकडे पैसे जमा करणाऱ्या सदनिकाधारकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याची बाब समोर आली आहे.
दंडाच्या रकमेचा भुर्दंड सदनिकाधारकांना
इमारतींमधील काही सदनिकाधारक सोसायटी समितीकडे वेळेवर पैसे जमा करीत नाहीत; तर काही सदनिकाधारक पैसे देतच नाहीत. यामुळे पाणी देयकाची रक्कम पालिकेकडे भरली जात नसून यामुळे नळजोडणी खंडित करण्याच्या कारवाईला सामोरे जाण्याबरोबरच दंडाच्या रकमेचा भुर्दंड अनेक प्रामाणिक सदनिकाधारकांना सोसावा लागत आहे. याचसंदर्भात मनसेचे ठाणे व पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना या समस्येवर तोडगा काढण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे उपनगर अभियंता विनोद पवार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
...................................
८६ हजार नळजोडण्यांवर जलमापके
संपूर्ण शहरात एक लाख १३ हजार ३२८ नळ जोडण्या असून त्यात रहिवास आणि वाणिज्य अशा दोन्ही नळजोडण्यांचा समावेश आहे. आतापर्यंत ८६ हजार नळजोडण्यांवर जलमापके बसवण्यात आली आहेत. त्यापैकी गेल्या वर्षी मार्च महिन्यापूर्वी ४८ हजार जलमापके बसवण्याची कामे पूर्ण झाली होती. यंदाच्या वर्षी आणखी २२ हजार ग्राहकांना नळ मीटरद्वारे बिले पाठवण्यात येत आहेत.