केईएममध्‍ये ईईजी विभाग सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केईएममध्‍ये ईईजी विभाग सुरू
केईएममध्‍ये ईईजी विभाग सुरू

केईएममध्‍ये ईईजी विभाग सुरू

sakal_logo
By

केईएममध्‍ये ईईजी विभाग सुरू
अपस्माराच्‍या ६०० रुग्णांवर यशस्वी उपचार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : अपस्मार या रोगाला सामान्य भाषेत मिरगी किंवा फिट येणे असेही म्हणतात. या रोगासंदर्भात संपूर्ण राज्यामध्ये फक्त केईएममध्येच शस्त्रक्रिया केली जाते. या शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असलेला व्हिडीओ ईईजी विभाग नुकताच केईएम रुग्णालयात सुरू करण्यात आला आहे. यामुळे अपस्‍मार रोगावर अधिक प्रभावी उपचार होतील, अशी माहिती केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी दिली.
एपिलेप्सी म्हणजे अपस्मार हा मेंदूचा एक जुना असंसर्गजन्य आजार आहे. ज्यामुळे कोणीही नागरिक प्रभावित होऊ शकतो. जगभरात ५० दशलक्ष लोकांना अपस्मार आहे. योग्य निदान आणि उपचार झाल्यास ७० टक्के रुग्ण अपस्मारमुक्त होऊ शकतात. मात्र, यासंबंधित जनजागृती कमी असल्याने अनेकदा नागरिक योग्य उपचारांपर्यंत पोहोचत नाहीत. त्यातून रुग्णाला जन्मभर व्यंगत्व येऊ शकते किंवा गंभीर परिस्थितीत जीवही गमावू शकतो, असे तज्‍ज्ञांचे मत आहे. केईएम रुग्णालयात आतापर्यंत अनेक रुग्णांवर उपचार करण्यात आले असून ६४६ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यातील २५० नागरिकांनी शस्त्रक्रियेनंतर त्यांचे आयुष्य पूर्णत: बदलले असून, ते आनंदी आयुष्य जगत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

अपस्माराची कारणे
अनेकदा लहान मुलांना तीव्र ताप आल्यावर किंवा मेंदूमध्ये काही गुंतागुंत निर्माण झाल्यास हा त्रास सुरू होतो. अनेकांना औषधोपचाराने मिरगीचा त्रास नियंत्रणात आणणे शक्य असते; मात्र २० ते २५ टक्के नागरिकांना होणारा त्रास हा औषधानेही बरा होत नाही. अशा वेळी त्यांची व्हिडीओ ईईजी, एमआरआय, पेट स्कॅन, न्युरो सायकोलॉजी यांच्या माध्यमातून तपासणी करण्यात येते. या तपासणीमध्ये मेंदूचा नेमका कोणता भाग ग्रस्त झाला, याची माहिती मिळते. या तपासणीनंतर शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात येतो.

६४६ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया
केईएम रुग्णालयात आतापर्यंत ६४६ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. यामध्ये लहान बालकांपासून मोठ्यांचा समावेश असून, १८ वर्षांवरील ५४० रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान मागील १० वर्षांतील रुग्णांच्या प्रकृतीचा आढावा सध्या रुग्णालयाकडून घेण्यात येत आहे. यामध्ये २५० नागरिकांनी मिरगीसंदर्भात केलेल्या शस्त्रक्रियेनंतर त्यांचे आयुष्य पूर्णत: बदलून गेले आहे. शस्त्रक्रियेनंतर त्यांचे आयुष्य आनंदी झाले असल्याचे केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी सांगितले.

पाच हजारांत शस्त्रक्रिया
अपस्मार होणाऱ्या रुग्णांना अधिकाधिक चांगली सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केईएम रुग्णालयाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतात. त्यानुसार, ही शस्त्रक्रिया अवघ्या पाच हजारांमध्ये केली जाते. शिवाय, आवश्यक असलेली व्हिडीओ ईईजी तपासणी सात हजारांमध्ये करण्यात येते. शस्त्रक्रियेवेळी काही गुंतागुंत झाल्यास हा खर्च ३५ हजारांपर्यंत जाऊ शकतो. मात्र खासगी रुग्णालयांमध्ये या शस्त्रक्रियेसाठी ६५ ते ७० हजारांपर्यंत खर्च येतो.