Railway Jumbo block : जम्बो ब्लॉकसाठी रेल्वे सज्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Central Railway jumbo block
जम्बो ब्लॉकसाठी रेल्वे सज्ज

Railway Jumbo block : जम्बो ब्लॉकसाठी रेल्वे सज्ज

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील सर्वांत जुना पूल म्हणून ओळखला जाणारा कर्नाक उड्डाणपूल पाडण्यात येणार असून गर्डर काढण्यासाठी १९ ते २० नोव्हेंबरपर्यंत २७ तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी गुरुवारी (ता. १७) अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन कर्नाक उड्डाणपूल पाडण्याच्या कामाचा आढावा घेतला. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून सर्व रेल्वे अधिकाऱ्यांना वेळेत काम पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. दरम्यान, ब्लॉकच्या कालावधीत बेस्टतर्फे सीएसएमटी, कुलाबा, भायखळा, दादर, वडाळा आदी परिसरात विशेष बस सोडण्यात येणार आहेत.

रेल्वेच्या बांधकाम, अभियांत्रिकी, वीज, ऑपरेटिंग, कमर्शियल आणि आरपीएफ अशा सर्व विभागांनी ब्लॉकचे योग्य व्यवस्थापन करावे. पूल तोडण्यासाठीची सर्व कामे निर्धारित वेळेत पूर्ण करावीत. ब्लॉकदरम्यान मेल-एक्स्प्रेस आणि लोकल सेवा सुरळीत राहण्यासाठी त्याबाबतची योग्य आणि नियमित उद्‍घोषणा करावी. मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या शॉर्ट टर्मिनेशनबाबत सर्व प्रवाशांना एसएमएसद्वारे माहिती द्यावी, अशा सूचना महाव्यवस्थापकांनी बैठकीत दिल्या.

महाव्यवस्थापकांच्या सूचना
- मध्य रेल्वेच्या प्रमुख स्थानकांवर प्रवाशांच्या सोयीसाठी हेल्प डेस्कची व्यवस्था करावी
- प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट आणि एमएसआरडीसी यांनी समन्वय साधत बस सोडाव्यात
- सुरक्षेच्या दृष्टीने आरपीएफने जीआरपी आणि राज्य पोलिसांशी समन्वय साधावा
- ब्लॉक कालावधीत विविध स्थानकांवर पोलिस दलांची नियुक्ती करावी