फ्रँकफर्टमध्ये आज रंगणार कवितांची मैफल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फ्रँकफर्टमध्ये आज रंगणार कवितांची मैफल
फ्रँकफर्टमध्ये आज रंगणार कवितांची मैफल

फ्रँकफर्टमध्ये आज रंगणार कवितांची मैफल

sakal_logo
By

महेंद्र सुके : सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १८ : जगभरात वेगवेगळी माणसे वेगवेगळ्या देशांत जातात, तिथे राहतात, तिथलीच होऊन जातात; मात्र अशा माणसांच्या मनात कायमस्वरूपी घर करून राहतात, त्यांच्या मायबोलीतील गाणी अन्‌ कविता. जर्मनीतील फ्रँकफर्टमध्ये राहणाऱ्या अशाच विविध देशांतील ३० भाषांमधल्या लोकांना त्यांच्या हृदयाजवळची गाणी, कविता सादर करण्याची संधी मिळणार आहे. ही आगळीवेगळी मैफल रंगणार आहे फ्रँकफर्टच्या अल्टे ऑपेरामध्ये १९ नोव्हेंबरला. यात आपल्या महाराष्ट्रातील शर्वी मुळे, शिल्पा गडमडे आणि साकेत काटकर सहभागी होणार आहेत.

‘मिटेन आम रँड’ म्हणजेच ‘सीमेच्या मध्यभागी’ असे या उत्सवाचे नाव असून, त्यात केवळ संगीतावरच नव्हे, तर कलेच्या माध्यमातून सामाजिक विषयांवरही १९ ते २१ नोव्हेंबरदरम्यान लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. उद्या (ता. १९) या उत्सवाची सुरुवात जपानी दिग्दर्शक अकिरा ताकायामा यांच्या ‘अवर साँग’ (आमची गाणी) या प्रोजेक्टने होणार आहे. २०१८ मध्ये सिडनीमध्ये उदयाला आलेल्या या संकल्पनेंतर्गत आता फ्रँकफर्टमध्ये राहणाऱ्या भारत, अफगाणिस्तान, बांगलादेश, फिनलँड, आइसलँड, कोरिया, मेक्सिको, पेरू आणि तुर्कमेनिस्तान यांसारख्या विविध देशांतील ३० भाषांमधील लोक त्यांच्या हृदयाजवळची गाणी, कविता सादर करणार आहेत. मैफलीत जर्मनीत वास्तव्याला असलेली शिल्पा गडमडे ग्रेस यांची ‘भय इथले संपत नाही’ ही कविता, साकेत काटकर ‘खेळ मांडला’ हे नटरंगमधील गाणे; तर शर्वी मुळे ही गणपतीची आराधना सादर करणार आहे.

रिकाम्या खुर्च्यांसमोर सादरीकरण
अकिरा ताकायामा यांच्या सकल्पनेतील ‘अवर साँग’ प्रोजेक्टमध्ये सहभागी होणारे एकामागून एक स्टेजवर जातील. त्यांच्यासमोर प्रेक्षक नसतील. जाणूनबुजून रिकाम्या ठेवलेल्या खुर्च्यांसमोर संगीत, परिचयाशिवाय आपले गाणे गातील, कविता म्हणतील. त्यांच्या मनात वसलेल्या मायबोलीतील गाणे किंवा कविता दुसरीकडे बसलेल्या प्रेक्षकांना ऐकता येईल, अशी या मैफलीची आगळीवेगळी रचना आहे.

भारतातून दुसऱ्या देशात जाऊन राहताना मनाच्या एका कोपऱ्यात मातृभूमी, मायबोली आणि आठवणी सतत नांदत असतात. जर्मनीतील दैनंदिन जीवनात, अडचणीच्या काळात कुठले तरी गाणे, कुठली तरी कविता तुमचे बोट अलगद धरून तुम्हाला मनाने थेट मायभूमीत तुमच्या लोकांमध्ये नेऊन सोडते. ग्रेस यांची ‘भय इथले संपत नाही’ ही कविता मला अशीच सातत्याने नव्याने भेटते. ‘अवर साँग’मधून माझ्या मनाजवळची कविता फ्रँकफर्टमध्ये मांडता येणार आहे, याचा आनंद आहे.
- शिल्पा गडमडे, कवयित्री