बाळासाहेब सावरकरांना का मानत होते? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाळासाहेब सावरकरांना का मानत होते?
बाळासाहेब सावरकरांना का मानत होते?

बाळासाहेब सावरकरांना का मानत होते?

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १८ : आदित्य ठाकरे यांच्यावर मी कधी बोलत नाही. ते बालिश आहेत, कधी कोणाला भेटायला जातील, हे सांगता येणार नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे देशासाठी मोठे योगदान आहे. बाळासाहेब ठाकरे हे सावरकरांना का मानत होते, याची माहिती आदित्य ठाकरे यांना नाही. ना त्यांना माहीत, ना त्याचे वडील उद्धव ठाकरे यांना. राहुल गांधी हे सावरकर यांच्याबद्दल बोलले, याची कोणत्याही प्रकारची चीड त्यांना आलेली नाही, अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली.

डोंबिवलीमध्ये एका खासगी रुग्णालयाच्या उद्‍घाटनासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे सपत्नीक शुक्रवारी (ता. १८) आले होते. या वेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित होते. भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याविषयी वक्तव्य केले आहे. याविषयी राणे म्हणाले, अनेक वर्षे देशात काँग्रेस सत्तेत असल्यानंतर आता त्यांना भारत जोडो करावेसे वाटते. हे करून यातायात स्वतःची करून घेत आहेत. यांच्यामागे किती लोक सामील आहेत. महाराष्ट्रात आले, तरी नवीन लोक त्यांच्यामध्ये सामील होत नाहीत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या सर्व पक्षांची मिळून भारत जोडो यात्रा सुरू आहे; पण यात्रेत ते सामील नाहीत. या तीन पक्षांची मने जुळली नाहीत, सत्तेसाठी ते फक्त एकत्र आलेले आहेत. यामध्ये त्यांना फारसे यश मिळणार नाही. पंतप्रधान मोदी हे विधायक कार्य करत असून आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान असल्याचे मंत्री राणे म्हणाले.

नीलम गोऱ्हे यांच्याबाबत गौप्यस्फोट
शिवसेनेवर टीका केल्याशिवाय त्यांना प्रमोशन मिळत नाही, अशी टीका ठाकरे गटातील नेत्या नीलम गोऱ्हे यांनी शेलार यांच्यासह राणे यांच्यावर केली आहे. यावर राणे यांनी, त्यांनी उलट सांगितले, असे म्हणत त्यांना आठवते का विचारा, असा सवाल केला. माझ्या शिफारशीशिवाय त्या शिवसेनेत राहिल्या नसत्या. शिवसेना सोडून त्या चालल्या होत्या. मी त्यांना थांबवले होते, हे आठवतेय का त्यांना विचारा. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना मंत्रिपद मिळाले नाही, म्हणून त्या नाराज होत्या, असा गौप्यस्फोट त्यांनी केला.

अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रखडल्याने चाकरमान्यांची गैरसोय होत आहे. त्याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की, या रस्त्याच्या कामाचा कंत्राटदार पळून गेल्याने काम थांबले होते; पण आता नवीन कंत्राटदाराची नेमणूक केली असून लवकरच काम पूर्ण होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.