निर्देशांकांची सलग दुसरी घसरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निर्देशांकांची सलग दुसरी घसरण
निर्देशांकांची सलग दुसरी घसरण

निर्देशांकांची सलग दुसरी घसरण

sakal_logo
By

मुंबई, ता. १८ ः कोणत्याही अनुकूल संकेतांअभावी आज सेन्सेक्स व निफ्टी या भारतीय शेअर बाजार निर्देशांकांची घसरण झाली. सेन्सेक्स ८७.१२ अंश; तर निफ्टी ३६.२५ अंश घसरला.
आज जागतिक शेअर बाजार मंद असल्यामुळे भारतीय बाजारही फार उसळी घेऊ शकले नाहीत. सकाळी व्यवहारांना सुरुवात होताना भारतीय शेअर बाजार स्थिर होते, नंतर त्यांच्यात मोठी घसरण झाली; मात्र शेवटच्या अर्ध्या तासात खरेदी झाल्यामुळे भाव बऱ्यापैकी सावरले, तरीही बाजार तोट्यातच बंद झाले. दिवसअखेर सेन्सेक्स ६१,६६३.४८ अंशांवर; तर निफ्टी १८,३०७.६५ अंशावर स्थिरावला.
आज निफ्टीच्या प्रमुख पन्नासपैकी ३५ शेअरचे भाव घसरले; तर सेन्सेक्समधील मुख्य ३० पैकी २० शेअरचे भाव घसरले. आता मोठ्या तेजीसाठी भारतातून कुठलेही संकेत मिळणार नसल्यामुळे परदेशी शेअर बाजारांकडे भारतीय गुंतवणूकदारांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यातच अमेरिकी फेडरल बँकेच्या अध्यक्षांच्या आक्रमक विधानांमुळे सर्व जण धास्तावल्याची प्रतिक्रिया जाणकार देत आहेत. आज फक्त सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे शेअर तेजीत होते; तर वाहननिर्मिती कंपन्यांचे शेअर घसरले.
आज सेन्सेक्सच्या प्रमुख शेअरपैकी हिंदुस्तान लिव्हर, एशियन पेंट्स, एचसीएल टेक, स्टेट बँक, कोटक बँक, इन्फोसिस, एचडीएफसी या शेअरचे भाव वाढले. मात्र ते एक टक्क्यांपेक्षा कमीच वाढले. महिंद्र आणि महिंद्र अडीच टक्के; तर मारुती दीड टक्का कोसळला. बजाज फायनान्स, इंडसइंड बँक, एअरटेल, अल्ट्राटेक, आयटीसी, विप्रो, बजाज फीनसर्व्ह, टायटन हे शेअर अर्धा ते दीड टक्का घसरले.