दिल्ली पथक वसईत दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिल्ली पथक वसईत दाखल
दिल्ली पथक वसईत दाखल

दिल्ली पथक वसईत दाखल

sakal_logo
By

विजय गायकवाड : सकाळ वृत्तसेवा
नालासोपारा, ता. १८ : श्रद्धा वालकर हत्याकांडाचा तपास करण्यासाठी दिल्लीचे एक पथक आज (ता. १८) वसईत दाखल झाले. त्यांनी माणिकपूर गुन्हे प्रकटीकरण कक्षाच्या कार्यालयात आठ तास तपास केला. २०२० मध्ये श्रद्धाला आफताबकडून मारहाण झाल्याने तिला वसईत तीन दिवस एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याच काळात आफताब तिला वारंवार मारहाण करत असल्याने नालासोपारा पूर्व तुळिंज पोलिस ठाण्यात तिने दखलपात्र गुन्ह्याची नोंदही केल्याचे उघड झाले आहे.

२०२० मध्ये श्रद्धा आणि आफताब हे वसई पूर्व परिसरातील व्हाईट हिल्स रिगल सोसायटीत रूम भाड्याने घेऊन लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. याच काळात आफताबने तिला वारंवार बेदम मारहाण करत होता. श्रद्धाने याची माहिती गॉडविन नावाच्या मित्राला दिली होती. गॉडविनने त्याचा मित्र राहुल राय याला तिच्या घरी पाठवले होते. त्या वेळी श्रद्धाच्या गळ्यावर, तोंडावर मारल्याच्या खुणा होत्या. या प्रकरणी नोव्हेंबर २०२० मध्ये श्रद्धाने नालासोपारा पूर्व तुळिंज पोलिस ठाण्यात आफताबविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता; पण त्यांच्यात समझोता झाल्याने पुन्हा दोघे एकत्र राहत होते; पण आफताब हा नशा करत असल्याने त्याची सवय जात नव्हती.

श्रद्धाच्या वडिलांनी ६ ऑक्टोबरला पहिली तक्रार दिल्यापासून माणिकपूर पोलिसांनी याचा तपास आहेत. दिल्लीतील मेहरौली पोलिस ठाण्याचे पथक आज वसईत दाखल झाले. या पथकाने आज दोन जबाब नोंदविले असून, त्यात श्रद्धाचा बालपणीचा मित्र लक्ष्मण नाडर आणि लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते त्या घरमालकाचा समावेश आहे; पण पोलिसांनी या घरामालकाचे नाव सांगण्यास नकार दिला. या सर्व प्रकरणात लक्ष्मणची महत्त्वाची भूमिका आहे. लक्ष्मणने श्रद्धाच्या भावाला फोन करून, तिचा फोन बंद आहे आणि घातपात झाल्याची शक्यता असल्याचे सांगितल्याने या सर्व प्रकरणाला वाचा फुटली. दिल्ली पोलिस या हत्याकांडाचा आता कसून तपास करत आहेत. या प्रकरणात सर्व सबळ पुरावे जमा करण्यासाठी आता दिल्ली पोलिस सक्रिय झाले असून, वसई, विरार, नालासोपारा, नायगाव परिसरातील दोघांचे मित्र-मैत्रीण यांचेही जवाब घेणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

खासगी रुग्णालयात दाखल
आफताबच्या मारहाणीत श्रद्धाच्या मान आणि कंबरेचा त्रास झाल्याने तिला नालासोपारा वसई लिंक रोडवरील खासगी रुग्णालयामध्ये तीन दिवस दाखल करण्यात आले होते. वसई, नालासोपारा, नायगाव या परिसरात त्यांनी रूम भाड्याने घेऊन लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले आहेत. वसई पूर्व परिसरात त्यांनी एका रूमच्या करारामध्ये पती-पत्नी असल्याचेही सांगितले असल्याची माहिती समोर आली आहे.

श्रद्धा हत्याकांडाचा तपास करण्यासाठी आम्ही दिल्लीवरून आलो आहोत. आज दोन जणांचे जबाब नोंदविले आहेत आणि सर्वांगाने तपास करणार असून तपास सुरू आहे.
- संदीप कुमार
तपास अधिकारी, पोलिस उपनिरीक्षक, महरोली पोलिस ठाणे

मानेचा आणि कंबरेचा त्रास होत असल्याने श्रद्धा रुग्णालयात उपचारासाठी आली होती. ३ ते ६ डिसेंबर २०२० असे तीन दिवस रुग्णालयात तिला दाखल केले होते. या वेळी आफताब तिच्यासोबत होता. त्यांनी आम्हाला मारहाणीचा प्रकार न सांगितल्यामुळे आम्ही माहिती पोलिसांना कळवली नव्हती.
- डॉ. शिवाप्रसाद शिंदे,
ओझोन मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल, वसई पूर्व

आफताब श्रद्धाला नेहमी मारहाण करीत होता. अनेक वेळा त्याने तिचा गळा दाबला आहे. तिला वारंवार मारहाण करत असल्यामुळे गॉडविनच्या सांगण्यावरून नोव्हेंबर २०२० मध्ये तिला आफताबविरोधात तक्रार करण्यासाठी तुळिंज पोलिस ठाण्यात नेले होते. तिथे तक्रारही दाखल केली होती.
- राहुल राय, श्रद्धाचा मित्र

नोव्हेंबर २०२० मध्ये श्रद्धाने आमच्याकडे तक्रार दिली असल्याची माहिती आज मिळाल्यावर आम्ही सर्व एनसी आणि तक्रारींचे अर्ज शोधत आहोत. पण तसे काही आमच्याकडे सापडले नाही. पण कर्मचारी आणखी रेकॉर्ड तपासत आहेत.
- राजेंद्र कांबळे,
वरिष्ठ पोलिस निरीक्षक, तुळिंज पोलिस ठाणे