झिराडमध्ये होणार बहुद्देशीय क्रीडा संकुल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

झिराडमध्ये होणार बहुद्देशीय क्रीडा संकुल
झिराडमध्ये होणार बहुद्देशीय क्रीडा संकुल

झिराडमध्ये होणार बहुद्देशीय क्रीडा संकुल

sakal_logo
By

प्रमोद जाधव, अलिबाग
झिराडसह अलिबाग तालुक्यातील खेळाडूंना हक्काचे क्रीडा संकुल मिळावे, यासाठी झिराडपाडा परिसरात अद्ययावत बहुउद्देशीय क्रीडा संकुल उभे राहणार आहे. नुकत्‍याच झालेल्‍या ग्रामसभेत ग्रामस्थांनी एकमताने या प्रस्‍तावास मंजुरी दिली असून विरोधकांकडूनही क्रीडा संकुलाला समर्थन देण्यात आले आहे. त्यामुळे झिराडमध्ये लवकरच अद्ययावत क्रीडा संकुल उभे राहणार आहे.
झिराडपाडा परिसरात अनेक महिन्यांपासून सर्व सोयींयुक्त क्रीडा संकुल उभारण्याचे काम सुरू आहे. संकुलाच्या माध्यमातून स्थानिक खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळावे, यासाठी जिल्हा परिषद माजी समाजकल्याण सभापती दिलीप भोईर यांनी पुढाकार घेतला आहे. मात्र काही विरोधकांनी संकुलाच्या उभारणीसह उत्खननाबाबत आक्षेप घेतला होता.
झिराडच्या सरपंच दर्शना भोईर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्‍या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा झाली. संकुल लोकसहभागातून उभारले जाणार असून त्‍यामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. महिला बचत गटामार्फत वेगवेगळे उपक्रम राबवून स्थानिकांना आर्थिक उत्पन्न मिळवून देण्याचा प्रयत्नही करण्यात येत आहे.
संकुलावर ग्रामपंचायतीचे नियंत्रण राहणार असून यातून ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल. क्रीडा संकुलसाठी खोदण्यात आलेल्या मातीचा व दगडांचा वापर त्याच संकुलाच्या कामांसाठी करण्यात आला आहे. त्याचा कोणत्याही प्रकारे गैरवापर करण्यात आलेला नाही. ही बाब जिल्हा परिषद माजी समाजकल्याण सभापती दिलीप भोईर यांनी ग्रामसभेच्या निदर्शनास आणून दिली. सरकारी जागेचा उपयोग सार्वजनिक उपक्रमांसाठी होत आहे, हे त्‍यांनी ग्रामसभेच्या लक्षात आणून दिले. ग्रामस्थांनी एकमताने क्रीडा संकुलसाठी मंजुरी दिली. यावेळी विरोधकांनीही क्रीडा संकुलसाठी समर्थन देत त्यांच्या माती, दगड उत्खनानाबाबत असलेल्या उपस्‍थित प्रश्‍नांचे निराकरण झाल्‍याचे ग्रामसभेत स्पष्ट केले.
ग्रामसभेत जिल्हा परिषद माजी समाजकल्याण सभापती दिलीप भोईर, सरपंच दर्शना भोईर, उपसरपंच सुजाता माने, सर्व सदस्य, तसेच ग्रामसेवक संजय पाटील आदींसह ग्रामस्थ, महिला व गाव पंच कमिटी, तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

झिराड ग्रामपंचायतीला १९५६ पासून स्व-मालकीचे क्रीडांगण नव्हते. येथील स्थानिक
तरुणांना हक्काचे क्रीडांगण मिळावे, यासाठी ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने संकुलाचे काम सुरू केले. मात्र एक-दोन जणांनी माती-दगड उत्खननाबाबत विचारणा केली. याबाबत नुकत्‍याच झालेल्या ग्रामसभेत चर्चा करण्यात आली. या प्रकल्पासाठी एक कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. लोक सहभागातून खर्च होणार असून क्रीडांगणात लेदर बॉलचा सराव करता यावा, राज्य, राष्ट्रीय स्तरावर खेळाडू निर्माण व्हावे, ही भावना आहे.
- दिलीप भोईर, माजी सभापती,
समाजकल्याण जिल्हा परिषद