मुंबई अहमदाबाद महामार्गावर अनधिकृत धंदे जोरात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई अहमदाबाद महामार्गावर अनधिकृत धंदे जोरात
मुंबई अहमदाबाद महामार्गावर अनधिकृत धंदे जोरात

मुंबई अहमदाबाद महामार्गावर अनधिकृत धंदे जोरात

sakal_logo
By

मनोर, ता. १९ : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मनोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल आणि ढाब्यांवर अनधिकृत धंद्यांना जोर आला आहे. महामार्गावरील भंगार आणि केमिकल माफिया सक्रिय झाले असून महामार्गालगतच्या नांदगाव, आवंढाणी, बेलपाडा आणि चिल्हारच्या हद्दीत दिवस-रात्र लोखंड, डांबर, डिझेल, केमिकल आणि सळ्या खरेदी-विक्री सुरू आहे. डिझेल, केमिकल आणि डांबर हाताळताना सुरक्षेच्या उपाययोजना पाळल्या जात नसल्याने दुर्घटना घडण्याचा शक्यता व्यक्त केली जात आहे.

नांदगाव फाट्यावर महामार्गाच्या गुजरात मार्गिकेलगत असलेल्या वजन काट्याच्या मागच्या बाजूला गुजरात राज्यातील बंटी नामक माफियाने नुकताच लोखंडी सळ्या आणि केमिकल खरेदी-विक्रीचा अवैध धंदा सुरू केला आहे. या ठिकाणी महामार्गवर मालवाहतूक करणाऱ्या ट्रकमधून मोठ्या प्रमाणात लोखंडी सळ्या आणि केमिकल बेकायदा उतरवले जात आहे. बेकायदा खरेदी केलेल्या सळ्यांचा आणि केमिकलचा साठा ट्रकमध्ये भरून गुजरात, मध्य प्रदेश आणि भिवंडीला पाठवला जात असल्याची माहिती समोर येत आहे.

महामार्गालगतच्या वाडा-खडकोना-नांदगाव, आवंढाणी, बेलपाडा आणि चिल्हार गावच्या हद्दीतील ढाब्याच्या आवारात अनधिकृत धंदे सुरू करण्यात आले आहेत. महामार्गावरील टॅंकरचालक त्यांच्या आर्थिक फायद्यासाठी ते चालवत असलेल्या टॅंकरमधून केमिकल, डांबर आणि ऑइलची चोरी करून विक्री करीत असतात. माफियांचे टँकरचालकांसोबत अनधिकृत धंदे करण्यासाठी साटेलोटे असल्याने सर्व सोपस्कार पार पाडून महामार्गावर धंदा सुरू झाल्याची माहिती टँकरचालकांना दिली जाते. केमिकल आणि डांबर उतरवण्यासाठी आलेल्या टँकरमधून इलेक्ट्रिक पंपाच्या साह्याने दोनशे लिटरच्या ड्रममध्ये माल काढला जातो. ठरलेली रक्कम टँकरचालकाला दिली जाते.

..............................
ज्वलनशील पदार्थांमुळे दुर्घटनेची शक्यता
ज्वलनशील पदार्थ असलेले डिझेल, डांबर आणि रसायनांची चोरी करताना सुरक्षेच्या उपाययोजना केल्या जात नसल्याने आग लागून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे महामार्गावरील माफियांना कायद्याचा धाक उरला नसल्याने अवैध धंदे बिनबोभाट सुरू आहेत. रात्रीच्या अंधारात केले जाणारे अनधिकृत धंदे आता दिवसाउजेडी सुरू आहेत.


.......................
अनधिकृत धंदे सुरू असलेली ठिकाणे
- बेलपाडा-अमन ढाबा
- चिल्हार फाटा-आदिवासी ढाबा
- नांदगाव-सम्राट हॉटेल लगत
- चिल्हार फाटा-विनोद सरदार
- वाडा खडकोना-जय अंबे ढाबा

................................
मनोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांच्या ठिकाणांची माहिती घेऊन कारवाया सुरू करण्यात आल्या आहेत.
- उमेश पाटील, पोलिस निरीक्षक, मनोर पोलिस ठाणे