ठाण्याच्या सनायाला दुहेरी मुकूट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्याच्या सनायाला दुहेरी मुकूट
ठाण्याच्या सनायाला दुहेरी मुकूट

ठाण्याच्या सनायाला दुहेरी मुकूट

sakal_logo
By

ठाणे, ता. १९ : ठाण्याच्या सनाया ठक्कर हिने भांडुप येथे पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य सब ज्युनियर अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेतील ११ वर्षांखालील वयोगटात उल्लेखनीय कामगिरी केली आणि दुहेरी मुकूटाचा मान संपादन केला.
या स्पर्धेत ठाणे महापालिकेच्या सय्यद मोदी प्रशिक्षण योजनेंतर्गत छोट्या वयापासून बॅडमिंटनचे धडे गिरवणाऱ्या चिमुकल्या खेळाडूंनी विविध वयोगटात पदके मिळवून कौतुकास्पद कामगिरी केली. ११, १३ व १५ वर्षांखालील वयोगटात खेळवल्या गेलेल्या या स्पर्धेतील लढतींमध्ये खेळाडू, पालकवर्ग आणि बॅडमिंटनप्रेमींचा उदंड प्रतिसाद लाभला. ११ वर्षांखालील मुलींमध्ये सनाया ठक्कर हिने प्रभुत्व गाजवले आणि आपल्या पहिल्यावहिल्या दुहेरी मुकुटाला गवसणी घातली. याच गटात अंजना नायर हिनेही कौतुकास्पद कामगिरी केली. या ठाणेकर जोडीने ११ वर्षांखालील दुहेरी गटात अजिंक्यपद प्राप्त केले; तर एकेरी गटामध्ये सनाया सुवर्णपदक मिळवून वरचढ ठरली. अंजना नायर हिने रौप्यपदक पटकावले. अंजना आणि सनायाने उपांत्य फेरीत मनस्वी पवार व थीमिरा रत्नानी या जोडीचा २१-३, २१-४ असा सहज पराभव केला; तर अंतिम फेरीत क्षितिजा पाटील व मनाली कीर्तने यांचा २१-१६, २१-४ असा पराभव करून दबदबा कायम ठेवला.

रुजुल-साहिलला रौप्यपदक
१५ वर्षांखालील मुलांमध्ये दुहेरी गटात रुजुल वडते आणि साहिल निखाते यांनी रौप्यपदकावर मोहोर उमटवली. बॅडमिंटनचे प्रशिक्षण घेण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातून ठाण्यात सय्यद मोदी बॅडमिंटन अकादमीमध्ये स्थायिक झालेल्या साहिलने नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करून दुहेरी मुकुटासह अजून एका पदकाची प्राप्ती केलेली आहे. या स्पर्धेतदेखील दुहेरी गटात रौप्यपदक प्राप्त करून या दोघांनीही विजयी धुरा कायम ठेवली आहे. १५ वर्षांखालील दुहेरी मिश्र गटात नवोदित जोडी रुजुल आणि निष्का गावडे यांनी उत्तम खेळाचे सादरीकरण करीत पहिल्यांदाच एकत्र खेळताना ब्राँझपदक पटकावण्याची कामगिरी केली आहे.

विजेत्यांचे कौतुक
उभरता खेळाडू रेवांथ शृंगारपुरे यानेदेखील उत्तम खेळाचे सादरीकरण करीत ११ वर्षांखालील मुलांमध्ये रौप्यपदक पटकावले आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात त्याने हिमांशू भटकरला साथीला घेऊन अधिरज शेट्टी व कवीर मेहरा या जोडीचा २१-११, २३-२१ असा पराभव केला आणि अंतिम फेरीत धडक मारली, परंतु अंतिम सामन्यात अटीतटीच्या लढतीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला. या चिमुकल्या खेळाडूंच्या विजयाबद्दल ज्येष्ठ प्रशिक्षक व ठाणे शहर आणि जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकांत वाड, अक्षय देवलकर व मयूर घाटणेकर तसेच क्रीडा अधिकारी मीनल पालांडे आणि ठाणे बॅडमिंटन अकादमीच्या संपूर्ण टीमने त्यांचे अभिनंदन केले.