यंदा भरपूर ''कर्तव्य'' आहे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यंदा भरपूर ''कर्तव्य'' आहे
यंदा भरपूर ''कर्तव्य'' आहे

यंदा भरपूर ''कर्तव्य'' आहे

sakal_logo
By

वसंत जाधव, नवीन पनवेल
कोरोनामुळे अनेकांनी विवाह सोहळे पुढे ढकलले होते. या वर्षी जूनपर्यंत अनेक मुहूर्त असल्‍याने यंदा भरपूर कर्तव्य आहे, असे म्हणत विवाह सोहळ्यांना प्रारंभ झाला आहे. त्यामुळे लग्नपत्रिकांना मागणी वाढल्याने व्यावसायिकांना सुगीचे दिवस आले आहेत. कोविड काळात लग्नपत्रिका विक्रेत्‍यांना मोठा फटका बसला होता. पाच-दहा टक्केही व्यवसाय होऊ शकला नाही.
दणक्‍यात विवाह करण्याचे नियोजन इच्छुक वधू-वरांच्या कुटुंबीयांकडून सुरू झाले असून लग्नपत्रिका अधिकाधिक आकर्षक करण्यावर भर दिला जात आहे. गतवर्षी अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून लग्‍नपत्रिका पाठवण्याला प्राधान्य दिले होते. तुळशी विवाह होताच लग्नपत्रिका छपाईचा व्यवसाय १०० टक्‍के तेजीत असल्‍याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले आहे.
पनवेलमध्ये शहरासह तालुक्‍यातील अनेक गावांतील नागरिक लग्नपत्रिका खरेदीसाठी येत आहेत. कागदाचे दर वाढल्याने पत्रिका महागली असली तरी खरेदीदारांचा ओघही वाढला आहे. बाजारात अवघ्‍या एक रुपयापासून ते ५००-१००० रुपयांपर्यंत किमतीच्या पत्रिकांना मागणी आहे.

ग्रामीण भागात चित्रशैलीच्या पत्रिकांना पसंती
शहरातील ग्राहक ५०० ते १००० पत्रिका, तर ग्रामीण भागातील ग्राहक दीड हजार ते दोन हजार पत्रिका खरेदी करीत आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांकडून ऐतिहासिक व धार्मिक चित्रे असलेल्‍या पत्रिकांना पसंती मिळत आहे, तर शहरी ग्राहकांकडून डिझाईन व साध्या पद्धतीच्या, इंग्रजी मजकूर असलेल्‍या पत्रिकांना मागणी आहे.

स्थानिकांचे प्रमाण अधिक
सोशल मीडिया आणि विविध ऑनलाईन संदेश पद्धतीने अनेक जण निमंत्रण देत आहेत. त्यामुळे लग्नपत्रिका वाटपावर कुठेतरी अंकुश असल्याचे जाणवते. त्याचा परिणाम म्हणजेच संबंध दुरावत आहेत. स्थानिक आगरी, कोळी, कराडी समाजातील ग्राहक मात्र आजही हजारांच्या प्रमाणात पत्रिकांची खरेदी करताना दिसतात. प्रत्येकाच्या घरापर्यंत पत्रिका पोच करणे, त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्यांच्याकडून लग्नपत्रिकांची जास्‍त संख्येने खरेदी होत असल्‍याची माहिती व्यावसायिकांकडून देण्यात आली.

दिल्‍ली स्‍क्रीन, शिवकाशी पत्रिकांना मागणी
मुंबई-गायवाडी, दिल्ली, अहमदाबाद, तमिळनाडू, शिवकाशी, राजकोट, इंदूर शहरातून प्रामुख्याने लग्नपत्रिका विक्रीसाठी शहरात येतात. दिल्ली स्क्रीन, अहमदाबाद स्क्रीन आणि शिवकाशी येथील लग्नपत्रिकांना अधिक मागणी आहे.

दोन वर्षांच्या तुलनेत यंदा ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. लग्नपत्रिका खरेदी-विक्री जोरात होत आहे. यंदा कागदाचे भाव वाढल्याने लग्नपत्रिकेच्या दरात ५ ते २० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.
- कृष्णा पाटील, व्यावसायिक