गुन्हेगारी घटवणारच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुन्हेगारी घटवणारच
गुन्हेगारी घटवणारच

गुन्हेगारी घटवणारच

sakal_logo
By

घाटकोपर, ता. १९ (बातमीदार) ः परिमंडळ सात पोलिस ठाण्यांच्या अखत्यारीत संभाव्य घडणारे गुन्हे रोखून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यावर भर देऊन गुन्हेगारी घटवणारच, असा निर्धार नुकताच पदभार स्वीकारलेले पोलिस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी व्यक्त केला आहे.
तरुण आणि नव्या पिढीला नशामुक्त करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जातील, असेही ते या वेळी म्हणाले. याच आठवड्यात पुरुषोत्तम कराड यांनी या परिमंडळाचे पोलिस उपायुक्त म्हणून पदभार स्वीकारला असून त्यांनी आपल्या कामाचा धडाका लावला आहे. या परिमंडळातील घाटकोपर आणि पंतनगर पोलिस ठाण्याच्या अखत्यारीत अमली पदार्थांची देवाणघेवाण करणारे आणि त्यातून घडणारे गुन्हे यावर तातडीने कडक कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी या पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांना दिले आहेत. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या अखत्यारीतील ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुणी यांच्याबाबत सजग राहण्याचे अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. त्यासाठी निर्भया पथकानाही मार्गदर्शन करण्यात येत आहे. या परिमंडळातील पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील गुन्हेगारी मोडून काढण्याला आपले प्राधान्य असणार आहे, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, या परिमंडळात पदभार स्वीकारण्याआधी कराड हे नवी मुंबई वाहतूक शाखेत उपायुक्तपदावर कार्यरत होते. पनवेल, उरण तसेच नवी मुंबई या ठिकाणी रोज १,५०० वाहनचालकांवर कारवाई केली जात होती; तर त्यापूर्वी त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादी भाग असलेल्या भामरागड येथेही आव्हानात्मक परिस्थितीत कर्तव्य पार पाडले आहे. सोलापूर ग्रामीण पोलिस दलातही तत्कालीन पोलिस अधीक्षक अमितेशकुमार यांच्या काळात उपअधीक्षकपदी काम करताना त्यांनी जिल्ह्यातील भल्याभल्या गुन्हेगारांना वठणीवर आणले होते. अत्यंत शिस्तप्रिय सेवा बजावणारे आणि संवेदनशील मनाचे अधिकारी अशी त्यांची ख्याती आहे.