राणीच्या बागेतील ऑनलाईन तिकिट प्रणालीचे उद्‍घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राणीच्या बागेतील ऑनलाईन तिकिट प्रणालीचे उद्‍घाटन
राणीच्या बागेतील ऑनलाईन तिकिट प्रणालीचे उद्‍घाटन

राणीच्या बागेतील ऑनलाईन तिकिट प्रणालीचे उद्‍घाटन

sakal_logo
By

राणीच्या बागेचे आता ऑनलाईन तिकीट!

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयासाठी महापालिकेने नुकतीच ऑनलाईन तिकीट नोंदणी प्रणाली सुरू केली आहे. ऑनलाईन प्रणालीमुळे पर्यटकांना क्यूआर कोडद्वारे किऑस्क मशीनच्या माध्यमातून छापील तिकीट घ्यावे लागणार आहे. त्यासाठी राणीच्या बागेत चार ठिकाणी किऑस्क मशीन ठेवण्यात आल्या आहेत.

मुंबई
राणीच्या बागेत पर्यटकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. साहजिकच तिकिटासाठी झुंबड उडत आहेत. पर्यटकांची सोय व्हावी आणि प्राणिसंग्रहालयात जाण्यासाठी तिकिटांच्या रांगेत उभे न राहता त्यांना घरबसल्‍या तिकीट मिळवता यावे, यासाठी महापालिकेच्या वतीने आॅनलाईन तिकीट प्रणाली सुरू करण्यात आली आहे. शुक्रवारी (ता. १८) अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्या हस्ते प्राणिसंग्रहालयाच्या शतकोत्तर हीरक महोत्सवाच्या सांगता समारंभात त्याचे उद्‍घाटन करण्यात आले.
पर्यटकांना https://themumbaizoo-ticket.mcgm.gov.in/ या लिंकवरून किंवा महापालिकेच्या संकेतस्थळावर तिकीट नोंदणी करता येणार असल्याचे पालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. दरम्यान, या वेळी पर्यावरणस्‍नेही केटी बागली आणि मेधा राजाध्‍यक्ष लिखित ‘निघाली प्राण्‍यांची मजेदार वरात’ या मराठी पुस्‍तकाचे व त्याच्या इंग्रजी अनुवादाचे प्रकाशन करण्‍यात आले. प्राणिसंग्रहालयातील वन्‍य प्राणीविश्‍वातील काही करामती आणि गमती-जमती या कवितांमधून बालमित्रांना वाचावयास मिळतील.

पेंग्विनच्या तीन पिलांचे बारसे
राणीच्या बागेत आणण्यात आलेले हम्बोल्ट पेंग्विन पर्यटककांचे प्रमुख आकर्षण ठरत आहेत. त्यांना पाहण्यासाठी बच्चे कंपनीची गर्दी होत आहे. काही दिवसांपूर्वीच हम्‍बोल्‍ट पेग्विंनने तीन नव्‍या पिलांना जन्म दिला. त्‍यांचे नामकरणही शुक्रवारी करण्यात आले. फ्लॅश (नर - जन्‍म ः २ एप्रिल २०२२), बिंगो (नर - जन्‍म ः २६ एप्रिल २०२२) आणि अॅलेक्‍सा (मादी - जन्म ः ९ ऑगस्ट २०२२) अशी त्यांची नावे ठेवण्यात आली आहेत.

प्लास्टिक क्रशर मशीन
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात प्‍लास्टिकच्‍या कचऱ्याची विल्‍हेवाट लावण्‍यासाठी प्लास्टिक बॉटल क्रशर संयंत्र बसवण्‍यात येत आहेत. प्रदूषण कमी करणे आणि पर्यावरणाचा समतोल राखणे, या दृष्‍टीने हा महत्त्‍वाचा उपक्रम ठरतो आहे. सदर उपक्रम सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) अंतर्गत राबविण्यात येत आहे.