साडेसहा हजार बालके गोवरच्‍या छायेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साडेसहा हजार बालके गोवरच्‍या छायेत
साडेसहा हजार बालके गोवरच्‍या छायेत

साडेसहा हजार बालके गोवरच्‍या छायेत

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २० : महापालिका क्षेत्रात गोवरच्या आजाराने डोके वर काढले असल्याची बाब समोर आली आहे. पालिकेच्या अहवालानुसार पालिका क्षेत्रातील सहा हजार ६५१ बालके ही गोवरच्या पहिल्या व दुसऱ्या डोसपासून वंचित असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे पालिकेची आरोग्य यंत्रणा आधी सतर्क झाली असून, शनिवारपासून आरोग्य विभागाने शहरातील विविध भागांत सर्वेक्षण मोहीम हाती घेतली असून आरोग्य विभागाच्या डॉक्टर, परिचारिका, कर्मचाऱ्यांसह अतिरिक्त ३०० कर्मचाऱ्यांची कुमक या कमी तैनात करण्यात आली आहे.

ठाणे महापालिकेच्या हद्दीतील शिळ आणि कौसा या नागरी आरोग्य केंद्रांच्या अंतर्गत गोवर या आजाराने बाधित १० रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. अशातच गोवर या आजाराची साखळी तोडण्यासाठी शिळ आणि कौसा आरोग्य केंद्रात पाच दिवसांत सर्वेक्षण पूर्ण करून, दुसरी फेरी लगेच पुढील पाच दिवसांत पूर्ण करण्याच्या सूचना पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी केल्या आहेत.
-----------------
उपाययोजना
लसीकरण वाढवणे, फिरते लसीकरण पथक तैनात करणे, ठाणे महापालिका क्षेत्रातील अंगणवाड्या, बालवाड्या येथील मुलांचे गोवर आणि रुबेला लसीकरण गतिमान करणे आदी विषयांवर अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी यांच्याकडेही बैठक झाली. त्यानंतर ठाणे पालिका हद्दीतील सर्व आरोग्य केंद्रांच्या परिसरात सर्वेक्षण मोहीम हाती घेण्यात आली असून, या सर्वेक्षणात ज्या बालकांनी लशीचा डोस घेतला नसेल त्यांचे लसीकरण करण्यात येत आहे.
---------------------------

बालकांच्या जन्मानंतर नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर गोवरचा पहिला, तर १९ महिने पूर्ण झाल्यानंतर दुसरा डोस घेणे अनिवार्य असते. ठाणे पालिका हद्दीतील सहा हजार ६५१ बालके ही गोवर लशीच्या डोसपासून वंचित असल्याची गंभीर बाब पालिकेच्या आरोग्य विभागाच्या अहवालानुसार समोर आली आहे. यामध्ये दोन हजार १३२ गोवरचा पहिला व चार हजार ५१९ बालकांनी दुसरा डोस घेतला नसल्याची बाब समोर आली आहे.
----------------------
गोवरची काळजी...
जन्मानंतर नऊ महिन्‍यांनी पहिला डोस
१९ महिने पूर्ण झाल्यानंतर दुसरा डोस
----------------------
बोलके आकडे
२,१३२ पहिला
४,५१९ दुसरा
६,६५१ एकूण
...................................

लसीकरण मोहीम रविवारीही सुरू
ठाणे महापालिका हद्दीत दिवसेंदिवस गोवर आजाराची संशयित व बाधित बालकांची संख्या वाढत आहे. याची गांभीर्याने दखल घेत, पालिका प्रशासनाकडून सर्वेक्षण मोहीम हाती घेण्यात आली असून ही मोहीम रविवारी देखील सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली.
..........................................
गोवरची लक्षणे
ताप, सर्दी, खोकला, डोळे लाल होणे, घशात दुखणे, अशक्तपणा, अंग दुखणे, तोंडाच्या आतील बाजूस पांढऱ्या रंगाचे चट्टे दिसणे अशी लक्षणे आढळल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घ्या. नागरिकांना गोवरसदृश्य लक्षणे आढळल्यास त्यांनी घरगुती उपाय करण्यात वेळ न घालविता तात्काळ ठाणे महापालिकेच्या नजीकच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा.