गरजूंना मदतीचा हात देणारा खाकीतील देवदूत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गरजूंना मदतीचा हात देणारा खाकीतील देवदूत
गरजूंना मदतीचा हात देणारा खाकीतील देवदूत

गरजूंना मदतीचा हात देणारा खाकीतील देवदूत

sakal_logo
By

पोलिस उपनिरीक्षक महेश गोसावी
प्रसाद जोशी : वसई
पोलिस म्हणजे भीती, अशी समज काही नागरिकांत असते; मात्र त्यांच्यातही प्रेम दडलेले असते. याचे उदाहरण म्हणजे आयुक्तालयाच्या विरार पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक कार्यरत असलेले महेश गोसावी आहेत. त्यांना समाजकार्याची आवड असून ते अडलेल्या गरजूंना मदतीसाठी हात पुढे करत आले आहेत. त्यांना व्हॉलीबॉल व क्रिकेटची आवड असून वृत्तपत्र, पुस्तके वाचन देखील जोपासत आहेत, हे विशेष म्हणावे लागेल.
मूळचे वज्रेश्वरी येथील महेश गोसावी हे १९८८ मध्ये पोलिस सेवेत रुजू झाले. प्रथम ठाणे ग्रामीण व त्यानंतर अनेक पोलिस ठाण्यातील विभागात त्यांनी काम केले. त्यांची आई मालती व वडील यशवंतगिरी गोसावी हे दोघे बालसुधारगृह भिवंडी येथे शिक्षक होते. पोलिस दलात काम करताना आपण समाजाचे देणे लागतो, ही उदात्त भावना गोसावी दाम्पत्य जपत आले आहेत. कोरोना काळातदेखील त्यांनी समाजातील आर्थिक दुर्बल घटकांची परिस्थिती जवळून पाहिली व अन्नधान्यापासून जमेल तशी मदत केली. यात त्यांच्या पत्नी माधवी गोसावी यांचाही मोलाचा वाटा होता. कोरोना प्रादुर्भाव असताना रस्त्यावर उतरून लोकांना मदत केली.
कोरोनापासून बचाव करण्यासाठी त्यांनी योद्धा म्हणून काम केले, दाटीवाटीच्या वस्तीत जाऊन जनजागृती केली. तसेच २०१४ मध्ये चर्चगेट दिशेने प्रवास करताना एका व्यक्तीची बॅग गाडीत राहिली, हे पाहून गोसावी यांनी रेल्वे पोलिसांकडे ती सुपूर्द केली व माणुसकीचे दर्शन घडवले.
....
आयुक्तांच्या हस्ते गौरव
सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला तर अनैतिक मानवी वाहतूक शाखेत असताना बनावट कॉल सेंटरमधून लाखो भारतीयांची फसवणूक करणारे रॅकेट उघडकीस आणले. तसेच गोसावी यांनी एका गुन्ह्याचा छडा लावताना सिनेमा निर्माता म्हणून वेषांतर केले व थेट बिहार येथून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. गुन्हे शाखा, टाडा पथक, अनैतिक मानवी वाहतूक शाखेतदेखील त्यांनी जबाबदारी सांभाळली व अनेक गुन्ह्यांची उकल केली. तसेच ३६३ कलमाखाली दाखल गुन्ह्यात चांगली कामगिरी केल्याने पोलिस आयुक्त सदानंद दाते यांच्या हस्ते त्यांना प्रशस्तिपत्रक व बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.
----
आजचे युग जरी स्पर्धात्मक असले तरी समाजमाध्यमांवर निर्माण होणाऱ्या अफवांपासून दूर राहिले पाहिजे. विनाकारण नेटच्या गराड्यात न अडकता चांगल्या ज्ञानाकडे वळावे. फास्ट फूड, व्यसन आजच्या पिढीची शारीरिक व मानसिक स्थिती बिघडवत आहेत. त्यामुळे यापासून दूर राहणे व व्यायाम, मैदानी खेळाकडे लक्ष द्यावे.
- महेश गोसावी, उपनिरीक्षक, विरार