फरार आरोपी पोलिसांच्या रडारवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फरार आरोपी पोलिसांच्या रडारवर
फरार आरोपी पोलिसांच्या रडारवर

फरार आरोपी पोलिसांच्या रडारवर

sakal_logo
By

विजय गायकवाड : सकाळ वृत्तसेवा
नालासोपारा, ता. १९ : ‘निर्भया’नंतर श्रद्धा वालकरच्या हत्याकांडाने संपूर्ण देशात तीव्र संतापाची लाट पसरली आहे. या घटनेने देशातील पोलिस यंत्रणा जागी झाली आहे. बलात्कार, हत्या करून फरारी झालेल्या आरोपीला शोधण्यासाठी विविध राज्यांतील पोलिस आता रवाना झाले आहेत. मात्र गेल्या दोन दिवसांत वसई, विरारमध्ये दोन आरोपी पकडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. परराज्यांतील गुन्हेगार वसई तालुक्यात मोठ्या प्रमाणात वास्तव्य करत असल्यामुळे स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे.

तमिळनाडूतील आवडी पोलिस आयुक्तालय हद्दीत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या तरुणाने १३ जुलै २०२२ रोजी १८ वर्षांच्या तरुणीसोबत लैंगिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तिने प्रतिकार केल्यावर त्याने तिची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार करून तिच्या अंगावरील दागिने घेऊन फरारी झाला होता. याबाबत राजू मणी नायर याच्याविरोधात पोनामल्ली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. हा आरोपी पालघर जिल्ह्यातील विरार पूर्वेतील फुलपाडा, गांधी चौक परिसरातील सुजाता अपार्टमेंटमध्ये राहत होता. पोनामल्ली ठाण्याचे पोलिस निरीक्षक पी. आर. चिदंबरम मुरगेशन यांनी माहिती मिळाल्यानंतर ते विरारमध्ये येत, विरार पोलिसांच्या मदतीने त्याला अटक केली. शुक्रवारी (ता. १८) वसई जेएमसी न्यायालयात हजर करून वॉरंट घेत तमिळनाडूला पोलिस रवाना झाले आहेत.

ओडिसा राज्यातील गंजगम जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीची हत्या करून फरारी आरोपी हा वसईच्या वालीव पोलिस ठाणे हद्दीत राहत असल्याची माहिती समोर आली होती. या आरोपीवर कोडाला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. यावरून ओडिसा पोलिसांनी १७ नोव्हेंबर रोजी वालीव पोलिसांना संपर्क केला. वसईत आल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक कैलास बर्वे यांच्या पथकाच्या मदतीने वालीव परिसरातील सर्व कंपन्यांमध्ये शोध घेत आरोपीला अटक करण्यात यश मिळविले आहे.

नालासोपारा पूर्वेतील श्रीराम नगर येथून १८ सप्टेंबर २०२२ रोजी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने करु हुलास यादव या दहशतवाद्याला अटक केली होती. त्याच्यावर सरकारने १५ लाखांचे बक्षीस ठेवले होते. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओ) या केंद्र सरकारने बंदी घातलेल्या संघटनेचा हजारीबाग येथील समिती सदस्य होता. झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यातील तो राहणारा होता.

वसई तालुका गुन्हेगारांचा अड्डा
गुन्हेगारी रोखण्यासाठी १ ऑक्टोबर २०२० रोजी मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयाची स्थापना झाली. पोलिस ठाणे, अधिकारी, कर्मचारी संख्याबळ वाढले; पण गुन्हेगारांचा अड्डा बनत चाललेल्या वसई, विरार, नालासोपारा, नायगाव परिसरात वास्तव करणाऱ्या परराज्यांतील गुन्हेगारांना अटकाव करण्यात स्थानिक पोलिस अपयशी ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे.

आम्ही कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न करतोच; पण परराज्यांत गंभीर गुन्हे करून आरोपी दाटीवाटीच्या वस्तीत सहारा घेतात. मजुरी किंवा अन्य कामे करत असल्याने गर्दीच्या ठिकाणी त्यांना ओळखणे कठीण होते. अशा गुन्हेगारांना पकडण्यासाठी स्थानिक नागरिकांच्या मदतीची गरज असते. एकादा बाहेरील व्यक्ती परिसरात येऊन रूम भाड्याने घेऊन राहतो, त्यावेळी संबंधित घरमालकाने त्याची माहिती पोलिसांना दिली पाहिजे. एखाद्या कामगार नाक्यावर, मजुरीचे कामासाठी अनोळखी व्यक्ती आला असेल तर त्याची माहितीही त्या कामगार संघटनेने कळवली पाहिजे.
- सुरेश वराडे,
वरिष्ठ पोलिस निरीक्षक, विरार पोलिस ठाणे.