ज्येष्ठ अभिनेत्री तबस्सूम यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ज्येष्ठ अभिनेत्री तबस्सूम यांचे निधन
ज्येष्ठ अभिनेत्री तबस्सूम यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेत्री तबस्सूम यांचे निधन

sakal_logo
By

मुंबई, ता. १९ : दूरदर्शनवरील ‘फुल खिले है गुलशन गुलशन’ या लोकप्रिय कार्यक्रमामुळे घरोघरी पोहोचलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि मुलाखतकार तबस्सूम गोविल यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने एका खासगी रुग्णालयात शुक्रवारी (ता. १८) निधन झाले. त्या ७८ वर्षांच्या होत्या. सांताक्रूझ येथे उद्या (ता. २०) त्यांच्या शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. तबस्सूम यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.

तबस्सूम यांनी बालकलाकार म्हणून चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. १९४७ मध्ये बालकलाकार ‘बेबी तबस्सूम’ म्हणून ‘नर्गिस’ या चित्रपटातून त्यांनी पदार्पण केले. बाल कलाकार म्हणून त्यांनी नंतर मेरा सुहाग (१९४७), मंझधर (१९४७), बडी बहन (१९४९) आणि दीदार (१९५१) या चित्रपटांमधून भूमिका केल्या. कारकिर्दीच्या उत्तरार्धात त्यांनी अनेक चरित्र भूमिका केल्या. स्वर्ग (१९९०) हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. त्यांनी आपल्या मुलासाठी चित्रपटाची निर्मिती केली होती.

त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. बालकलाकार ते अभिनेत्री आणि यशस्वी मुलाखतकार अशी त्यांची कारकीर्द बहरत गेली. हम नौजवान, हकीकत, प्यार का मौसम, बाप बेटी, मुगल-ए-आझम, बैजू बावरा, दीदार, सरगम अशा अनेक हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. तबस्सूम गेल्या वर्षीच कोरोनामधून बऱ्या झाल्या होत्या. जवळपास १० दिवस रुग्णालयात घालवल्यानंतर त्या बऱ्या झाल्या. त्या वेळी तिच्या मुलाने त्यांना अल्झायमरचे निदान झाल्याच्या अफवादेखील फेटाळून लावल्या होत्या. तबस्सूम यांचा विवाह लोकप्रिय टीव्ही स्टार अरुण गोविल यांचे भाऊ विजय गोविल यांच्याशी झाला होता. तबस्सूम यांच्या पार्थिवावर शुक्रवारी अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.

आवाज घरोघरी पोहोचला...
रेडिओ सिलोनवरील अत्यंत गाजलेल्या ‘बिनाका गीतमाला’ या कार्यक्रमामध्ये तबस्सूम यांनी अमिन सयानी यांच्याबरोबर निवेदिकेची भूमिका केली. त्या वेळी घरोघरी त्यांचा आवाज पोहोचला; मात्र त्यांना सर्वांत जास्त लोकप्रियता मिळाली ती दूरदर्शनवरील ‘फुल खिले है गुलशन गुलशन’ कार्यक्रमामुळे. त्यांनी १९७२ ते १९९३ या काळात दूरदर्शनवरील सेलिब्रिटी टॉक शोचे सूत्रसंचालन केले होते. या कार्यक्रमाला त्यांनी आपल्या विशिष्ट शैलीने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. त्यांना अमाप प्रसिद्धी मिळाली.