खारघर दारूमुक्तीसाठी सर्वपक्षीय एकत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खारघर दारूमुक्तीसाठी सर्वपक्षीय एकत्र
खारघर दारूमुक्तीसाठी सर्वपक्षीय एकत्र

खारघर दारूमुक्तीसाठी सर्वपक्षीय एकत्र

sakal_logo
By

खारघर, ता. २० (बातमीदार) : खारघर शहर दारूमुक्त शहर असावे, अशी स्‍थानिक रहिवाशांची मागणी आहे. त्यामुळे नव्याने सुरू झालेला निरसुख पॅलेस आणि पूर्वीपासून सुरू असलेला अजित पॅलेस बार कायमस्वरूपी बंद व्हावे यासाठी खारघर वासियांनी लढा देण्याचा संकल्प नुकताच झालेल्या बैठकीत केला आहे. ही लढाई कायदेशीर मार्गाने संघर्ष समितीच्या माध्यमातून लढण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे.
शहरात १५ वर्षांपूर्वी सुरू झालेले दारूचे दुकान रहिवाशांच्या प्रखर संघर्षामुळे बंद करावे लागले होते. बार संस्कृती उदयास येवू नये, म्‍हणून प्रखर विरोध असताना रायगड जिल्हा महसूल विभागाने कोणत्या आधारे बारला परवाना दिला, परवाना देताना पोलिस, महापालिका आणि सिडकोकडून लागणारे ना हरकत पत्राची मागणी केली का, याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.

शहरात जनजागृतीचा संकल्‍प
१५ वर्षांपूर्वी सुरू केलेले दारूचे दुकान बंद करण्यासाठी खारघरमधील ३५ संस्था, संघटना, राजकीय पक्ष एकत्रित आले होते. आता सुरू झालेला निरसुख पॅलेस आणि पूर्वीपासून सुरू असलेला अजित पॅलेस बार बंद व्हावे, यासाठी संघर्ष समितीच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या लढ्यात जास्तीत जास्त नागरिक सहभाग व्हावे तसेच सर्वपक्षीय नेते, सामाजिक संघटना आणि परिसरातील गावांनी विशेषतः महिलांनी आणि तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग होत, जनजागृती करण्याचा संकल्प केला आहे.

व्होट बँक वाढविण्यावर लक्ष
पनवेल महापालिकेची निवडणूक काही महिन्यात होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे मतदारांचे मन जिंकण्यासाठी सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांना दारू बंदीविरोधात उभारल्या जाणाऱ्या लढ्यात सहभागी व्हावे लागणार आहे. जो पक्ष लढ्यात सहभागी होणार नाही, त्यांच्या विरोधात मतदार मतदान करतील, अशी भीती राजकीय पक्षांना आहे. त्यामुळे लढ्यात सहभागी होण्याशिवाय पर्याय नाही, अशी चर्चा परिसरात सुरू आहे.

माजी नगरसेवकांची बैठकीला पाठ
खारघरच्या विकासासाठी पालिकेत प्रतिनिधित्व करण्यासाठी खारघर वासियांनी बारा नगरसेवक निवडून दिले होते. खारघर दारू मुक्तसाठी लढा देणाऱ्या सर्वपक्षीय समितीच्या बैठकीला माजी नगरसेवक उपस्थित राहतील, अशी अपेक्षा होती. मात्र सर्व लोक प्रतिनिधींनी बैठकीकडे पाठ फिरविली. ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटातील शिवसेनेचे कार्यकर्तेही बैठकीला उपस्थित नव्हते. मंगळवार, (ता.२२) सेक्टर १२ मधील वासुदेव बळवंत फडके उद्यानात सायंकाळी साडे सहा वाजता बैठक होणार आहे. या वेळी किती माजी नगरसेवक उपस्थित राहून लढ्याला पाठिंबा देतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
...................

बार बंद करून फलक फाडला
खारघरमध्ये भाजपचे आंदोलन

खारघर, ता. २० (बातमीदार) : खारघरमध्ये दारू, बारच्या परवानगीला रहिवाशांचा विरोध असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाने परवानगी मिळाली कशी दिली, अशी विचारणा करीत खारघरमधील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी निरसुख पॅलेस बारसमोर निदर्शन करून आघाडी सरकारचा निषेध केला. तसेच बारचा नामफलकही फाडला. आंदोलनात माजी नागरसेवक प्रवीण पाटील, नरेश ठाकूर, गुरुनाथ गायकर, शत्रुघ्न काकडे, माजी सरपंच संजय घरत, कीर्ती नवघरे, माजी नगरसेविका हर्षदा उपाध्याय, आरती नवघरे तसेच गीता चौधरी, बिना गोगरी, साधना पवार, विनोद घरत, राजेंद्र मांजरेकर, दीपक शिंदे यांच्यासह जवळपास दोनशे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
खारघर परिसरात नव्याने बार आणि दारूच्या दुकाने सुरू होवू नये यासाठी खारघरमधील नागरिकांनी संघर्ष समितीच्या माध्यमातून अनेकदा मोर्चे, आंदोलने केली आहे. असे असतानाही राज्य उत्पादन शुल्क विभागाने सेक्टर दहामध्ये बारला परवानगी दिली.
खारघरमध्ये सर्व नगरसेवक भाजपचे आहे. शहरातील काही विरोधक
सत्ताधाऱ्यांकडे बोट दाखवत असल्यामुळे रविवारी भाजपच्या कार्यकर्त्यानी कोपरा बस थांबा येथील निरसुख पॅलेस समोर निदर्शन करून बारला आघाडी सरकारच्या काळात परवानगी देण्यात आल्‍याचे नागरिकांच्या निदर्शनास आणून दिले. जोपर्यंत बार बंद होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्‍याचे या वेळी सांगण्यात आले. खारघर वरिष्ठ पोलिस निरीक्षक विमल बिडवे यांनी कायदेशीर लढाई लढण्याचा सल्‍ला दिल्‍यावर आंदोलन मागे घेण्यात आले.

खारघरमध्ये नव्याने बार आणि दारूच्या दुकानास भाजपचा विरोध आहे. निरसुख पॅलेस बारला आघाडी सरकारच्या काळात परवानगी मिळाली आहे. मात्र काही विरोधक सत्ताधाऱ्यांचे नाव घेत असल्यामुळे भाजपने आंदोलन केला. खारघरमध्ये नव्याने बार सुरू होवू नये, ही भाजपची भूमिका आहे.
- बिना गोगरी, उपाध्यक्षा, खारघर-तळोजे मंडल, भाजप