प्रीमियर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रीमियर
प्रीमियर

प्रीमियर

sakal_logo
By

करिना कपूरने हंसल मेहतांच्या चित्रपटाचे चित्रीकरण केले पूर्ण
अभिनेत्री करिना कपूर-खानने हंसल मेहता यांच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. करिनाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये तिने मेहतांसोबत अद्याप शीर्षक नसलेल्या चित्रपटात काम केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ‘सर्वोत्कृष्ट संघ’ असे घोषवाक्य असलेल्या क्लॅपरबोर्डसोबत तिचा एक फोटोही तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. करिना कपूरने चित्रपटाच्या सेटवर घेतलेले फोटो शेअर केले आहेत. हंसल मेहता यांनी आपल्या चित्रपटातील कलाकार आणि क्रूचे आभार मानण्यासाठी इन्स्टाग्रामवर फोटोसह एक पोस्ट शेअर करत, ‘स्पेशल टीम एका खास चित्रपटासाठी खास शूट पूर्ण करते’ असे शीर्षक दिले आहे. हंसल मेहता यांच्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाची अद्याप तारीख निश्चित झालेली नाही. बालाजी मोशन पिक्चर्स आणि महाना फिल्म्ससोबत एकता कपूर या सिनेमाची सहनिर्माती आहे.

........
राम मंदिरावरील चित्रपटाला अमिताभ बच्चन यांचा आवाज
अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या राम मंदिराची सर्वत्र चर्चा सुरू आहे. २०२३ पर्यंत या मंदिराचे काम पूर्ण होईल. दरम्यान, आता राम मंदिराचा ५०० वर्षांचा इतिहास लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी लवकरच मंदिराचा इतिहास आणि त्यासाठी केलेल्या संघर्षाची कथा दाखवणारा चित्रपट बनवण्यात येणार आहे. ही जबाबदारी प्रसिद्ध लेखक प्रसून जोशी यांनी घेतली असून विशेष म्हणजे या चित्रपटाला प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांचा आवाज लाभणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या राम मंदिर निर्माण समितीच्या दोन दिवसीय बैठकीत यावर चर्चा झाली; तर आता मंदिर बांधकाम समिती आणि श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट यांनी हा चित्रपट बनवण्यास मान्यता दिली आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन आपला आवाज देणार आहेत. हा चित्रपट दूरदर्शनवर दाखवला जाईल. इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्सचे सचिव सच्चिदानंद जोशी या चित्रपटादरम्यान समन्वयाचे काम करणार आहेत. चाणक्यसारखी लोकप्रिय मालिका बनविणारे चंद्रप्रकाश द्विवेदी आणि देशातील प्रसिद्ध साहित्यिक यतिंद्र मिश्रा यांचीही या चित्रपटासाठी मदत होणार आहे.
................
अठरा वर्षांनंतर तुषार कपूर साकारणार पोलिसाची भूमिका
गोलमाल, गोलमाल रिटर्न्स, ढोल, सिटी लाइट्स फेम बॉलीवूड अभिनेता तुषार कपूर विनोदी व्यक्तिरेखांसाठी प्रसिद्ध आहे. अशातच त्याने नुकतेच त्याच्या आगामी ‘मारीच’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला. हा एक थ्रिलर चित्रपट आहे, जो एक मर्डर मिस्ट्री आहे. विशेष म्हणजे तब्बल १८ वर्षांनंतर तुषार कपूर या चित्रपटात पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. याआधी तुषार कपूर १८ वर्षांपूर्वी ‘खाकी’ या चित्रपटात पोलिसाची भूमिका साकारताना दिसला होता. या भूमिकेबद्दल तुषार कपूर म्हणाला, ‘‘हा चित्रपट अनेक कारणांमुळे माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे. ‘लक्ष्मी’ नंतर निर्माता म्हणून ‘मारीच’ हा माझा दुसरा चित्रपट आहे आणि मी खूप दिवसांनी नसीरुद्दीन शाह यांच्यासोबत पुन्हा एकत्र येत आहे. हा चित्रपट एक अभिनेता म्हणून मला अनेक पातळ्यांवर आव्हान देतो. कारण मी पूर्वी जे चित्रपट केले त्यापेक्षा हा चित्रपट खूप वेगळा आहे, मला आशा आहे की प्रेक्षकांना माझा हा नवीन रंग आवडेल. ‘मारीच’ला ९ डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी खूप उत्सुक आहे.’’ ‘मारीच’ चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन द्रुवलाथे यांनी केले असून चित्रपटाची निर्मिती तुषार एंटरटेन्मेंट हाऊसच्या बॅनर खाली होत आहे.

..….....

आथिया आणि राहुल अडकणार विवाह बंधनात
प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेते सुनील शेट्टी यांची मुलगी अभिनेत्री आथिया शेट्टी आणि क्रिकेटपटू के. एल. राहुल यांच्या लग्नाची त्यांचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच नुकतेच अभिनेते सुनील शेट्टी यांनी त्यांच्या आगामी ‘धारावी बँक’ या सीरिजच्या लॉन्च इव्हेंटमध्ये आथिया आणि के. एल. राहुल यांच्या लग्नाबद्दल मोठा खुलासा केला. यावेळी सुनील शेट्टी यांनी लवकरच आथिया आणि राहुलचे लग्न होणार असल्याची घोषणा केली. आधी त्यांचे लग्न फाईव्हस्टार हॉटेलमध्ये पार पडणार होते; परंतु आता त्यांनी सुनील शेट्टी यांच्या खंडाळ्यातील ‘जहाँ’ या निवासस्थानी लग्नगाठ बांधणे पसंत केले आहे. आथिया आणि राहुल यांनी लग्नाची तयारी सुरू केली आहे.