दहा दिवसांत पलटणार केडीएमसीचे रुप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दहा दिवसांत पलटणार केडीएमसीचे रुप
दहा दिवसांत पलटणार केडीएमसीचे रुप

दहा दिवसांत पलटणार केडीएमसीचे रुप

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २० : शहर स्वच्छतेसोबतच शहर सौंदर्यीकरणाचे काम पालिका प्रशासनाने हाती घेतले आहे. शहरातील सामाजिक, अशासकीय संस्था, लोकसहभागातून हे काम केले जात आहे. कल्याण पश्चिमेतील शहाड येथील जकात नाका ते मोहने परिसरात स्वच्छता अभियान राबवित परिसर स्वच्छ करण्‍यात आला. येत्या दहा दिवसांत कल्याण-डोंबिवली शहराचे पालटलेले रूप नागरिकांना दिसेल, असा विश्वास शहर अभियंता अर्जुन अहिरे यांनी या वेळी व्यक्त केला.

कल्याण-डोंबिवली शहरातील रस्त्यांची अवस्था सुधारल्यानंतर आता शहर स्वच्छता व सौंदर्यीकरणावर पालिका प्रशासनाने भर दिला आहे. पावसाळ्यात रस्त्यांची लागलेली वाट आणि शून्य कचरा मोहिमेचे वाजलेले तीन-तेरा यामुळे अस्वच्छ शहराकडे पुन्हा केडीएमसीची वाटचाल सुरू झाली असल्याचे बोलले जात चित्र होते. सध्‍या पालिका हद्दीत प्रशासकीय राजवट लागू असल्याने पालिका अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले जात होते. गणेशोत्सवानंतर शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण करत अनेक रस्ते प्रशासनाने सुस्थितीत आणले आहेत. रस्ते सुधारल्यानंतर शहर स्वच्छता व सौंदर्यीकरणाचे काम हाती घेत शहराचे रूपडे पालटण्यासाठी पुन्हा एकदा पालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. या उपक्रमाला लोक सहभागाची जोड मिळाली असून शहरातील विविध सामाजिक संस्था आणि प्रतिष्‍ठित नागरिक, बांधकाम विकसकांनी यात उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे. शहर स्वच्छता आणि सौंदर्यीकरण मोहिमेअंतर्गत चौकांचे सुशोभीकरण, दुभाजकांची स्वच्छता व रंगरंगोटी, ट्रॅफिक बेटांचे नूतनीकरण यासोबतच रस्त्याची साईडपट्टी साफ करणे, तुटलेले पेव्हर ब्लॉक दुरुस्त करणे, रस्त्यांच्या किनाऱ्यालगतची धूळ साफ करणे अशी कामे केली जाणार असल्याची माहिती शहर अभियंता अर्जुन आहिरे यांनी या वेळी दिली. दुर्गाडी बायपास परिसरातदेखील स्वच्छता आणि सौंदर्यीकरण सुरू झाले आहे. आपले शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी शहरांच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या नवनवीन संकल्पना असल्यास पुढे येऊन त्याबाबत सहभाग नोंदविण्याचे आवाहनही शहर अभियंता अहिरे यांनी या वेळी केले. यावेळी घनकचरा विभागाचे उप आयुक्त अतुल पाटील, सचिव संजय जाधव, कार्यकारी अभियंता जगदीश कोरे, प्रशांत भागवत, सहायक आयुक्त राजेश सावंत, सुहास गुप्ते यांसह बांधकाम विकसक विजय रुपावत, मोहीत सिरनानी हेदेखील उपस्थित होते.
तलाव सुशोभीकरणाचे काम लवकरच
मोहने येथे आधारवाडी जेल रोड परिसरात असलेल्या तलावाची स्वच्छता करण्‍यात आली आहे. मोहिंदर काबुल सिंग शाळेच्या एनएसएस पथक व पालिका प्रशासन यांच्या सहकार्याने हा तलाव व आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला गेला; परंतु तलाव परिसरात स्वच्छता करूनही वारंवार निर्माल्य आणि प्लास्टिक पिशव्यांसह इतर कचरा टाकला जात असल्याचे दिसून आले. त्यामुळे येत्या काळात तलाव सुशोभीकरणचे काम हाती घेतले जाईल, अशी माहिती शहर अभियंता अहिरे यांनी दिली.