दर दीड वर्षांनी जीडीपीत एक लाखकोटी डॉलरची भर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दर दीड वर्षांनी जीडीपीत एक लाखकोटी डॉलरची भर
दर दीड वर्षांनी जीडीपीत एक लाखकोटी डॉलरची भर

दर दीड वर्षांनी जीडीपीत एक लाखकोटी डॉलरची भर

sakal_logo
By

मुंबई, ता. २० ः केंद्र सरकार ज्या गतीने एकाच वेळी सामाजिक आणि आर्थिक सुधारणा राबवीत आहे, ते पाहता पुढील दशकात भारत दर दीड वर्षांनी जीडीपीमध्ये एक लाख कोटी डॉलरची भर घालेल, असा विश्वास अदाणी उद्योगसमूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी यांनी व्यक्त केला.

मुंबईमध्ये सुरू असलेल्या २१ व्या वर्ल्ड काँग्रेस ऑफ अकाउंटंट्समध्ये ते शनिवारी बोलत होते. देश आर्थिक महासत्तेच्या दिशेने प्रवास करत असून देशातील आर्थिक वाढीला सामाजिक विकासाचीही जोड मिळाल्याचेही ते म्हणाले. केंद्र सरकारकडे बहुमत असल्याने राजकीय आणि प्रशासकीय संरचनात्मक सुधारणा सुरू करण्याची व त्यांच्या वेगवान अंमलबजावणीची क्षमता आहे. देशाच्या जीडीपीला एक लाख कोटी डॉलरचा टप्पा गाठण्यासाठी ५८ वर्षे लागली. दोन लाख कोटी डॉलरच्या टप्प्यासाठी १२ वर्षे आणि तीन लाख कोटी डॉलरच्या टप्प्यासाठी फक्त पाच वर्षे लागली. आता सरकारच्या उपाययोजनांमुळे पुढील दशकात भारत दर दीड वर्षानी जीडीपीमध्ये एक लाख कोटी डॉलरची भर घालेल. वर्ष २०५० पर्यंत आपली अर्थव्यवस्था ३० लाख कोटी डॉलरची असेल, असा विश्‍वास अदाणी यांनी व्यक्त केला.

आपल्या देशाची लोकसंख्या वाढत असली तरीही त्याचे जास्त फायदेच आपल्याला मिळतील. त्यामुळे आपली क्रयशक्ती वाढेल आणि कर भरणारी लोकसंख्या वाढेल. २०५० मध्ये भारताचे सरासरी वय फक्त ३८ वर्षे असेल. या कालावधीत भारताची लोकसंख्या पंधरा टक्क्यांनी वाढून एक अब्ज साठ कोटी होईल; परंतु दरडोई उत्पन्न सात पटीपेक्षा जास्त वाढून ते अंदाजे १६,००० डॉलर होईल. अशी क्रयशक्ती असलेल्या मध्यम वर्गाच्या वाढीमुळे मागणीत अभूतपूर्व वाढ होईल. त्यामुळे खाजगी आणि सरकारी खर्चात वाढ होईल. तसेच थेट परकीय गुंतवणूकही मोठ्या प्रमाणावर भारतात येण्याची शक्यता गौतम अदाणी यांनी वर्तविली.

२०५० पर्यंत चारपट ऊर्जेची गरज
------------------------------------
भारताला सध्या वापरत असलेल्या ऊर्जेपेक्षा सन २०५० पर्यंत चारपट अधिक युनिटची आवश्यकता भासेल. हे सारे आव्हानात्मक वाटत असले तरी तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे हे शक्य होईल. भारताचा अर्थवेग आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब केल्याने नवीन बाजारपेठ निर्माण होईल. पुढील तीन दशके हे भारताला उद्योजकतेच्या आघाडीवर नेईल, असा विश्वासही गौतम अदाणी यांनी व्यक्त केला.