अखेर कर्नाक पूल इतिहासजमा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अखेर कर्नाक पूल इतिहासजमा
अखेर कर्नाक पूल इतिहासजमा

अखेर कर्नाक पूल इतिहासजमा

sakal_logo
By

मुंबई, ता. २० : मध्य रेल्वेमार्गावरील सुमारे दीडशे वर्षांहून अधिक जुन्या कर्नाक उड्डाणपुलाचे पाडकाम अखेर आज पूर्ण झाले. या पाडकामासाठी मध्य रेल्वेने २७ तासांचा जम्बोब्लॉक नियोजित केला होता; मात्र वेळेआधीच काम पूर्ण करत १५ तास ५० मिनिटांमध्ये पुलाचे पाडकाम पूर्ण करण्यात आले. त्यानंतर १७ तासांनी मध्य रेल्वे, तर १९ तासांनी हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक पूर्ववत करण्यात आली. दरम्यान, या जम्बोब्लॉकमुळे प्रवाशांचे मात्र प्रचंड हाल झाले. दादर, कुर्ला, डोंबिवली आणि ठाणे स्थानकांवर भली मोठी गर्दी उसळली होती.
कर्नाक उड्डाणपूल हा मध्य रेल्वेमार्गावरील सर्वात जुना पूल म्हणून ओळखला जातो. सीएसएमटी ते मशीद बंदर स्थानकादरम्यान असलेल्या कर्नाक पुलाची निर्मिती १८६८ मध्ये झाली होती. हा पूल १५४ वर्षे जुना झाल्याने तो धोकादायक ठरवण्यात आला होता. अखेर मध्य रेल्वेकडून हा पूल पाडण्यासाठी २७ तासांचा जम्बोब्लॉक घेण्यात आला होता. शनिवारी रात्री ११ वाजल्यापासून पाडकामास सुरुवात झाली आणि रविवारी दुपारी २ वाजून ५२ मिनिटांनी काम पूर्ण करण्यात आले. त्यानंतर ओव्हरहेड वायर जोडण्यात आल्यानंतर पहिल्या टप्प्यात दुपारी ४ वाजता सीएसएमटी ते ठाणे; तर हार्बर मार्गावरील पहिली लोकल पनवेल-सीएसएमटी लोकल वडाळा येथून ५.४६ वाजता रवाना झाली, तर सीएसएमटी-पनवेल लोकल सीएसएमटी स्थानकांवरून ५.५२ मिनिटांनी रवाना झाली. विशेष म्हणजे मध्य रेल्वेने नियोजित केलेल्या वेळेपूर्वीच काम पूर्ण करण्यात यश आले. सातवी मार्गिका आणि यार्ड मार्गाचे काम रात्री उशिरा पूर्ण झाल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली.
----
मुंबईकरांचे अतोनात हाल
जम्बोब्लॉकमुळे सीएसएमटी ते भायखळा आणि वडाळ्यापर्यंतची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. प्रवाशांच्या सोयीसाठी दादर, ठाणे, कल्याण, वडाळा स्थानकातून विशेष लोकल चालवण्यात आल्या; परंतु त्या पुरेशा नसल्याने दादर, कुर्ला, डोंबिवली आणि ठाणे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. तसेच सीएसएमटी ते भायखळा आणि सीएसएमटी ते वडाळादरम्यान लोकल सेवा बंद असल्याने प्रवाशांना पर्यायी साधनांचा वापर करावा लागला. बेस्टने जादा बस सोडल्या असल्या, तरी प्रवाशांच्या गर्दीपुढे त्या अपुऱ्या होत्या. त्यामुळे अनेकांनी रिक्षा-टॅक्सीने प्रवास करण्यास प्राधान्य दिले.
---
सर्व मार्ग आणि सीएसएमटीवरील वाहतूक पूर्णपणे बंद असल्याने तसेच सूक्ष्म नियोजन आणि योग्य समन्वयामुळे कर्नाक पुलाचे काम नियोजित वेळेआधी पूर्ण करता आले. अत्याधुनिक यंत्रसामुग्री आणि सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांमुळे काम जलद गतीने पूर्ण करण्यात आले. तसेच या ब्लॉकचा उपयोग कामांसाठीही करण्यात आला.
- अनिल कुमार लाहोटी, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे.
...........
थोडक्यात इतिहास
- पुलाच्या बांधकामास सुरुवात - १८५८
- पुलाचे बांधकाम पूर्ण - १८६८  
- पुलाचे कामासाठी लागलेला कालावधी - १० वर्षे
- तत्कालीन गव्हर्नर जेम्स रिव्हेट कर्नाक यांच्या नावावरून पुलाचे नामकरण
- मध्य रेल्वेवरील सर्वांत जुना आणि उंचीने लहान उड्डाणपूल म्हणून ओळख
- इंग्रजी, मराठी आणि गुजराती या तिन्ही भाषेत पुलाचे नाव तीन कोपऱ्यांत कोरलेले
---
कोपरी पुलावर गर्डरसाठी ब्लॉक
पूर्व द्रुतगती मार्गावरील कोपरी रेल्वेउड्डाणपुलाचे गर्डर टाकण्यासाठी मध्य रेल्वेने रविवारी-सोमवारी मध्यरात्री १.३० ते ३.४५ या वेळेत मुलुंड आणि ठाणे दरम्यान विशेष पॉवर ब्लॉक घेतला आहे. त्यामुळे लांब पल्ल्याचा काही रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला.