विरो‍धकांचे आयुष्य उद्‍ध्‍वस्त करण्याचे काम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विरो‍धकांचे आयुष्य उद्‍ध्‍वस्त करण्याचे काम
विरो‍धकांचे आयुष्य उद्‍ध्‍वस्त करण्याचे काम

विरो‍धकांचे आयुष्य उद्‍ध्‍वस्त करण्याचे काम

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २० : विनयभंगाचा गुन्हा दाखल करताना पोलिसांनी आधी पुरावा गोळा करायला हवा होता; पण तसे काही झाले नाही. उद्या तुम्ही बलात्काराचा गुन्हा दाखल कराल आणि म्हणाल नंतर तपास करू. जिल्ह्यात राजकीय दबावाने पोलिस कारवाई करत आहेत. विरोध करणाऱ्यांचे आयुष्य उद्‍ध्‍वस्त करण्याचे काम सुरू आहे, असा घणाघाती आरोप आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केला.

हर हर महादेव चित्रपट बंद पाडल्यानंतर मारहाणीच्या गुन्ह्यात आमदार डॉ. आव्हाड यांना तुरुंगात जावे लागले. जामिनावर त्यांची मुक्तता होताच एका महिलेच्या तक्रारीवरून मुंब्रा येथील उड्डाणपुलाच्या उद्‍घाटनादरम्यान झालेल्या घटनेवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावरून पेटलेले राजकारण शांत होत असतानाच आमदार डॉ. आव्हाड यांनी व्हिडीओ जाहीर करत या सर्व कारवाया राजकीय हेतूने होत असल्याचे सांगितले. २०१६ पासून हे षड्‍यंत्र सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

समाजमाध्यमातून बदनामी करून सर्वप्रथम आपणाला चिथावण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर आपल्या घराची रेकीही करण्यात आली होती. हर हर महादेव हा चित्रपट बंद पाडल्यानंतर जे कलम ठाण्याला लागूच होत नाही ते लावण्यात आले. उड्डाणपूल उद्‍घाटनाच्या वेळीही घडलेल्या प्रकाराची पोलिसांनी कोणतीच शहानिशा न करता विनयभंगाची तक्रार आल्यानंतर खोटा गुन्हा दाखल केला. या तिन्ही घटनांमधून यामागे कोण आहे हे स्पष्ट होत असल्याचा आमदार आव्हाड यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.

मुख्यमंत्र्यांच्या गाडीवरच चढायचे बाकी आहे
मुख्यमंत्र्यांना काही प्रोटोकॉल आहे की नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मुंब्य्रात जी घटना घडली, त्या वेळी मुख्यमंत्र्यांच्या गाडीभोवती गर्दी होती. त्या गर्दीतून वाट काढत असताना आपण सगळ्यांनाच हाताने बाजूला सारत होतो; पण मुख्यमंत्र्यांच्या गाडीभोवती इतकी गर्दी असेल; तर आता केवळ गाडीच्या छतावरच चढायचे बाकी ठेवले आहे, असेही आव्हाड म्हणाले.