अपघातात मृत्यू व जखमी व्यक्तींचे स्मरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अपघातात मृत्यू व जखमी व्यक्तींचे स्मरण
अपघातात मृत्यू व जखमी व्यक्तींचे स्मरण

अपघातात मृत्यू व जखमी व्यक्तींचे स्मरण

sakal_logo
By

वसई, ता. २१ (बातमीदार) : रस्ते अपघातांत मृत्युमुखी अथवा गंभीर जखमी झालेल्या नागरिकांच्या स्मरणार्थ ‘जागतिक स्मरण दिन’ हा उपक्रम वसई उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथे पार पडला. यावेळी मृत व्यक्तींना आदरांजली वाहण्यात आली, तसेच वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळा, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले.
उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या या उपक्रमात अपघातग्रस्त व्यक्तींना शक्य ते सर्व साह्य आणि सहानुभूती मिळावी, आजपर्यंत अपघातग्रस्त झालेल्या व्यक्तींची, कुटुंबाची वाताहात लक्षात घेऊन सर्व वाहनचालकांना रस्ता सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या कार्यपद्धतीबाबत प्रतिज्ञाचे जाहीर वाचन झाले. त्यानंतर कार्यालयाच्या आवारात सर्व रस्ते अपघातांतील मृत व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर विरार येथील विवा महाविद्यालयाच्या मैदानावर विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेची शपथ देऊन त्या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात मोटार वाहन निरीक्षक किशोर इंगळे, अनिल गीते, प्रीतम वाघ, औदुंबर गवळी, अनिकेत गुंजाळ, नितीन ढगे, कल्याणी मंडलिक, चालक नरेंद्र महाजन आणि ड्राइव्हिंग स्कूल संचालक आदींनी सहभाग नोंदवला होता.
-------------
जनजागृती मोहीम
अपघातग्रस्त व्यक्तींचा आणि ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ या उक्तीला साजेसे ठरेल यासाठी जागतिक स्मरण दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार उपप्रादेशिक परिवहन विभागाने अपघात रोखण्यासाठी जनजागृती मोहीम हाती घेतली.
---------
अपघातग्रस्त आणि गंभीर जखमींच्या कुटुंबीयांच्या दुःखाकडे लक्ष वेधणे, त्यांना आधार मिळावा म्हणून या कार्यक्रमातून जनजागृती करण्यात आली. आपत्कालीन सेवा देणाऱ्या संस्था, व्यक्तींच्या योगदानाला अभिवादन करणे, अपघातग्रस्तांच्या अडचणींची दखल देणे, असे या जागतिक स्मरण दिनाचे मूळ उद्देश आहे.
- दशरथ वाघुले, अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन विभाग
--------------
वसई : अपघातग्रस्त व्यक्तीचे उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्मरण केले.