शिवरायांचे तत्त्‍व भाजपला मान्य नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवरायांचे तत्त्‍व भाजपला मान्य नाही
शिवरायांचे तत्त्‍व भाजपला मान्य नाही

शिवरायांचे तत्त्‍व भाजपला मान्य नाही

sakal_logo
By

मुंबई, ता. २१ : छत्रपती शिवाजी महाराजांबाबत सातत्याने वादग्रस्त विधान करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांची वादग्रस्त विधाने पहिली तर भाजपला छत्रपती शिवाजी महाराजांची सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण करण्याची संकल्पना मान्य नाही हेच दिसते, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव श्रीरंग बरगे यांनी केली आहे.
वारंवार छत्रपतींचा अवमान करणाऱ्यांबाबत दुटप्पी भूमिका घेणे हेच जर भाजपचे हिंदुत्व असेल तर भाजपला त्यांचे जातीय द्वेष निर्माण करणारे हिंदुत्व लखलाभ होवो, असे सांगून बरगे पुढे म्हणाले, की भाजपला जाती-धर्माच्या नावावर समाजात तेढ निर्माण करणारे हिंदुत्व हवे आहे. निवडणुकीत छत्रपतींच्या नावाने घोषणा देणारे भाजपवाले राजकारणासाठी कुठल्या थराला गेलेत हे आता जनतेने लक्षात घेऊन त्यांना जाब विचारला पाहिजे, असेही ते म्हणाले.

रामदासाशिवाय शिवाजी नाही, असे राज्यपाल म्हणाले होते. शिवाय महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या लग्नाचीही त्यांनी खिल्ली उडवली. ही वाक्ये महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला धक्का देणारी असून समाजात तेढ निर्माण करणारी आहेत. राज्यपाल कोश्यारी व प्रवक्ते त्रिवेदी या दोघांवर कडक कारवाई केली पाहिजे. शिवद्रोही राज्यपाल व त्रिवेदींना छत्रपतींचा गनिमी कावा दाखवावा लागेल.
- श्रीरंग बरगे, काँग्रेस सचिव

घाटकोपर पोलिसांकडे तक्रार
घाटकोपर ः मुंबई काँग्रेस प्रतिनिधी व जिल्हा कमिटीचे कोषाध्यक्ष केतन शहा व पदाधिकारी यांच्या वतीने घाटकोपर पोलिस ठाण्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्‍यावर कारवाई करण्याबाबत पत्र देण्यात आले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी पुढाकार घेऊन कारवाई करावी, अशीही मागणी या वेळी करण्यात आली.