रिक्षावाल्यांकडून प्रवाशांची खुलेआम लूट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रिक्षावाल्यांकडून प्रवाशांची खुलेआम लूट
रिक्षावाल्यांकडून प्रवाशांची खुलेआम लूट

रिक्षावाल्यांकडून प्रवाशांची खुलेआम लूट

sakal_logo
By

घणसोली, ता. २१ (बातमीदार)ः विभागात दिवसेंदिवस रिक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे, पण रिक्षांच्या वाढत्या संख्येसोबतच रिक्षाचालकांची मुजोरीदेखील वाढली असल्याने घणसोलीत मनमानी पद्धतीने भाडे आकारून नागरिकांची खुलेआम लूट सुरू आहे.
घणसोली विभाग दिवसेंदिवस विकसित होत चालला आहे. या विभागात दिवसेंदिवस रस्त्यांवर वाहनांची संख्या वाढली आहे, पण रिक्षाचालकांकडून मनमानी पद्धतीने भाडे आकारून नागरिकांना त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही मीटर अंतरावर जायचे असल्यास रिक्षाचालक अवाच्या सव्वा भाडे आकारत आहेत. त्याचबरोबर या विनापरवाना रिक्षा चालवणे, रेल्वेस्थानक परिसरातील बेकायदा रिक्षा थांबे असून अंतर्गत वादामुळे रस्त्याच्या विरुद्ध दिशेने वाहने उभी करणे, मद्यपान करून वाहन चालवणे, असे प्रकार होत असल्याने अपघाताची दाट शक्यता वर्तवली जात आहे. तसेच रिक्षाचालकांच्या बेशिस्त पार्किंगमुळे घणसोली स्थानक परिसरात दररोज वाहतूक कोंडीला सामोरे जाण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे.
-----------------------------------------
रस्त्यावरून चालणेही कठीण
घणसोली गावात तर रिक्षा थांब्यासाठी दुहेरी पार्किंग केली जाते. ज्यामुळे रस्त्यावर वाहतुकीस अडथळा आल्याने अनेकदा वाहतूक कोंडी होते. विभागात अस्ताव्यस्त पसरलेल्या रिक्षांच्या विळख्यातून दिवसा आणि रात्रीदेखील प्रवाशांना रस्ता ओलांडणे कठीण झाले आहे.
---------------------------------------------
शिस्त लावण्याची गरज
घणसोली विभागातील रिक्षाचालकांमध्ये व्यसनी लोकांचे प्रमाण अधिक वाढले आहे. व्यसनाधीनतेमुळे रिक्षाचालकांमध्ये मारामारी, शिवीगाळ असे प्रकार होतात. त्यामुळे अशा रिक्षाचालकांना शिस्त लावण्यासाठी आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी ठोस कार्यक्रम राबवणे गरजेचे आहे.
----------------------------------------
घणसोली विभागात काही रिक्षाचालक नियमांचे काटेकोरपणे पालन करतात. जे जुने रिक्षाचालक आहेत ते योग्य प्रकारे वाहतूक नियम पाळतात, मात्र नवीन आलेले रिक्षाचालक नियमांचे पालन करत नाही. त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे.
- प्रेमनाथ म्हात्रे, अध्यक्ष, स्थानिक प्रकल्पग्रस्त रिक्षा युनियन
-----------------------------------
घणसोली विभागात रिक्षाचालकांच्या वाढत्या मुजोरीवर वाहतूक विभागाच्यावतीने वारंवार कारवाई सुरूच असते. मात्र, तरीही रिक्षाचालकांची अरेरावीच्या तक्रारी येत आहेत. अशांवर वाहतूक विभागाने कारवाई करून दंड आकारला आहे.
- उमेश मुंडे, वाहतूक निरीक्षक
------------------------------------------
घणसोली विभागात रिक्षाचालकांची मुजोरी वाढत चालली आहे. कुठेही रिक्षा उभी करून गप्पा मारत बसतात, अनेकदा रस्त्यावर नागरिकांना ये-जा करण्यासाठी जागा उरत नाही, ज्यादा भाडे आकारणे असे प्रकार सर्रासपणे सुरू आहेत.
- नंदकुमार जाधव, नागरिक
-------------------------------------------
प्रत्येक महिन्याला घणसोली विभागातील रिक्षाचालकांवर कारवाई केली जाते. या महिन्यातदेखील १५, १६, १७, १८ या चार दिवसांमध्ये शंभरहून अधिक रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली. अद्यापही रिक्षाचालकांची मुजोरी वाढत असेल तर पुन्हा पथक पाठवण्यात येईल.
- हेमांगिनी पाटील, आरटीओ अधिकारी