जाहिरातींनी व्यापल्‍या रस्‍त्‍यावरील भिंती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जाहिरातींनी व्यापल्‍या रस्‍त्‍यावरील भिंती
जाहिरातींनी व्यापल्‍या रस्‍त्‍यावरील भिंती

जाहिरातींनी व्यापल्‍या रस्‍त्‍यावरील भिंती

sakal_logo
By

जोगेश्वरी, ता. २१ (बातमीदार) ः आजचे युग हे जाहिरातींचे युग आहे हे मान्य, पण जाहिरात करण्याला स्थळ, काळ, वेळ यांचे कसलेच बंधन उरले नसल्‍याचे अंधेरी व जोगेश्‍वरी भागात पाहायला मिळत आहे. पालिकेच्‍या परवानगीने जाहिरात न लागता अनधिकृत बॅनरबाजीचे पेव येथे पाहाला मिळत आहे. यामुळे या भागाचे सौंदर्य नाहीसे झाले असून नागरिकांनी अनधिकृत बॅनरवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
अंधेरी पूर्वच्‍या पंपहाऊसजवळील वेस्‍टर्न एक्‍स्‍प्रेसवेच्‍या पुलावरील भिंतीवर निवडणुकीचे तसेच इतर झालेल्‍या कार्यक्रमांचे मोठाले शुभेच्‍छांचे फलक; तर जोगेश्‍वरी पूर्वच्‍या सर्वोदयनगरमधील हेम इंडस्ट्रीच्‍या भिंतीला लावलेले मोठमोठाले सर्वच कार्यक्रमांचे फलक वेळ उलटून गेल्‍यावरही उतवरण्‍याची तसदी संबंधित मंडळांचे कार्यकर्ते तसेच पालिकाही घेत नसल्‍यामुळे या भिंती बॅनरबाजीचे हक्‍काचे ठिकाण झाल्‍यासारखे वाटत आहे.

बॅनरबाजी वॉर
विविध मंडळांकडून लावले जाणारे बॅनर पाहिल्‍यावर येथे मंडळांमध्‍ये जाहिरातीबाबत वॉर सुरू असल्‍यासारखे दिसून येत आहे. त्‍यातच कोणाचा बॅनर मोठा लागतो याचीही चढाओढ येथे लागली आहे. अनेक मोठमोठाले बॅनर या भागात उभारले जात असतानाही पालिका त्‍यावर कारवाई करत नसल्‍याने आश्चर्य व्‍यक्‍त होत आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष
बेस्ट प्रशासनाची बसथांब्यांची काळजी घेणारी व दक्षता पथकाची गाडी दररोज याच मार्गावरून मार्गस्थ होत असते. तसेच जवळच मेघवाडी पोलिस ठाणे आहे. तरीही या बॅनरवर कारवाई होत नसल्‍याने नागरिकांनी संताप व्‍यक्‍त केला आहे. अंधेरीप्रमाणे जोगेश्‍वरीतही सर्वोदयनगर येथेही हीच सिथती आहे. रस्‍त्‍यावरील भिंती, बस थांबे येथील अनधिकृत बॅनर त्‍वरित हटवावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

पालिकेची परवानगी न घेता अनधिकृतपणे विभागात बॅनर किंवा फ्लेक्स लावले असतील, तर नक्‍कीच कारवाई होईल. यासंदर्भात पाहणी केली जाईल. त्‍यावर पोलिसांकडे गुन्‍हा नोंदवून पुढील कारवाई करू.
- मनीष वळंजू, सहायक पालिका आयुक्‍त, के-पूर्व