कचराकोंडीमुळे प्रदूषणात वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कचराकोंडीमुळे प्रदूषणात वाढ
कचराकोंडीमुळे प्रदूषणात वाढ

कचराकोंडीमुळे प्रदूषणात वाढ

sakal_logo
By

वसई, ता. २१ (बातमीदार) : वसई-विरार शहरात शून्य कचरा मोहिमेची घोषणा जरी करण्यात आली तरी शास्त्रोक्त पद्धतीने विघटन करण्यास प्रशासनाला अद्याप यश आलेले नाही. शहरातील मोकळ्या जागेत कचऱ्याला आग लावून त्याची विल्हेवाट लावण्यात येत आहे. यामुळे वसई-विरार शहरातील वायुप्रदूषणात वाढ होत आहे. यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होत असून कचऱ्याला आग लागून धुराचे लोट शहरभर पसरत आहेत.
वसई-विरार शहरातील लोकसंख्या २५ लाखांच्या आसपास आहे. दाटीवाटीची वस्ती, औद्योगिक वसाहत, वाढते शहरीकरण पाहता कचऱ्याची समस्या आणखी बिकट होऊ लागली आहे. कचरा जमा करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी गोखिवरे येथे कचराभूमी आहे. मात्र याठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येत नसल्याने येथे कचऱ्याचे डोंगर उभे राहत आहेत.
वसई-विरार महापालिकेने जरी शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याच्या योजना आणल्या असल्या तरी निविदेला प्रतिसाद मिळत नाही किंवा तांत्रिक बाबींमुळे अडचणी येत आहेत. अशातच स्वच्छ सुंदर शहराची घोषणा हवेत विरली असल्याचे चित्र आहे. त्यामुळे मोकळ्या जागेत कचराभूमी निर्माण होत आहे. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी या कचऱ्याला आग लावण्यात येत आहे. त्यामुळे रहिवासी वस्त्यांना धुराचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे हवेची गुणवत्ता खालावत आहे.
एकीकडे महापालिका प्रदूषण रोखण्यासाठी वृक्षारोपण, कचऱ्याची विल्हेवाट लावणे अशा कागदोपत्री योजना आणत असली तरी प्रत्यक्ष कृती कधी करणार, असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासदेखील प्रशासन असमर्थ ठरत आहे. महापालिका घनकचरा व्यवस्थापनासाठी करोडो रुपयांची तरतूद करत असते, पण शहरातील कचऱ्याची समस्या कायम आहे. यावर पालिकेने योग्य त्या दिशेने पावले न उचलल्यास हवेची गुणवत्ता घसरून शहरात प्रदूषणाचे संकट उभे राहील, असे मत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केले.

----------------------------
कचराकुंड्या मोडकळीस
ओला व सुका कचरा वर्गीकरण करता यावा म्हणून दोन स्वतंत्र कचराकुंड्या गृहसंकुल व सार्वजनिक ठिकाणी प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात आली आहे; परंतु अनेक कचराकुंड्या या मोडकळीस आल्या आहेत; तर प्रमाणापेक्षा अधिक कचरा या कुंड्यांत टाकला जात असल्याने तो बाहेर पडलेला असतो. गेल्या दोन वर्षांत कचराकुंड्याच उपलब्ध झाल्या नसल्याने वर्गीकरण अडचणीचे ठरत आहे.
------------
सार्वजनिक ठिकाणी राडारोडा
महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी राडारोडा टाकू नये, अन्यथा दंडनीय कारवाई केली जाईल, अशी घोषणा महापालिकेने केली होती. त्यानुसार दंडाची रक्कम जाहीर केली; परंतु वसई, नालासोपारा व विरार भागात विविध प्रकारच्या बांधकामांतून निघणारा राडारोडा हा सार्वजनिक ठिकाणी टाकला जात आहे. त्यामुळे कागदोपत्री सोपस्कार पार पाडले, मात्र अंमलबजावणी न झाल्याने शहरात दिसून येत आहे.
-------------
वसई-विरार महापालिका कचरा वर्गीकरण व घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी प्रयत्नशील आहे. कचराभूमीवर कचरा कमी करण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. सार्वजनिक ठिकाणी मोकळ्या जागेत नागरिकांनी कचरा टाकू नये. कचराकुंडीत जमा करावा.
- अनिलकुमार पवार, आयुक्त
--------------------
दैनंदिन कचरा - ७०० मेट्रिक टन
सुका कचरा- १० हजार टन
ओला कचरा- १२ हजार टन
कचराभूमीवरील कचरा - १५ लाख मेट्रिक टन
कचरा भूमीचे क्षेत्र - १६०० हेक्टर
कचरा विलगीकरण मशीन (ट्रोमेल) : ४
वाहनांची संख्या - १५० मोठी तर २५० छोटी वाहने
----------------
कचरा व्यवस्थापनास अपयश
वसई महापालिकेने विल्हेवाट लावण्यासाठी खतनिर्मिती करणाऱ्या गृहसंकुलांना मालमत्तेत सूट देण्याचे जाहीर केले; परंतु हे प्रमाण फारच कमी आहे. घनकचरा व्यवस्थापन करता यावे यासाठी बायोमायनिंग, यांत्रिकी झाडू , वर्गीकरणाची स्वतंत्र वाहने व ओला व सुका कचरा वर्गीकरण बंधनकारक अशा योजना आणल्या, मात्र तरीही घनकचरा व्यवस्थान करण्यास अपयश येत आहे.
----------
वसई : शहरात कचऱ्याला आग लागून धुराचे लोट हवेत मिसळत आहेत.