मुंबईत खारे पाणी गोडे होणार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai Sea Beach
मुंबईत खारे पाणी गोडे होणार!

Sea Water Mumbai : मुंबईत खारे पाणी गोडे होणार!

मुंबई - समुद्राचे खारे पाणी गोडे करण्याच्‍या ‘डिसॅलिनेशन’ प्रकल्पाला स्थगिती दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती; मात्र या प्रकल्पास स्थगिती दिलेली नाही. या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल मुंबई महापालिकेला लवकरच मिळेल. त्यानंतर निविदा प्रक्रियेतील पुढच्या कामाला सुरुवात होईल, असे पालिकेतील एका अधिकाऱ्याने सांगितले.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी अलीकडेच प्रकल्पाच्या स्थगिती दिली गेल्याचा दावा कोला होता. समुद्राचे पाणी गोडे करण्याच्या प्रकल्पाला भाजपने सुरुवातीलाच तीव्र विरोध केला होता. शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर या प्रकल्पालाही स्थगिती मिळेल अशी चर्चा झाली होती. आदित्य ठाकरे यांनी गेल्या आठवड्याच्या अखेरीस घेतलेल्या पत्रकार परिषदेत डिसॅलिनेशन प्रकल्प स्थगित झाला का, या प्रकल्पाची नेमकी काय स्थिती आहे, याबाबत कोणतीच माहिती नसल्याचे म्हटले होते. डिसॅलिनेशन प्रकल्पाअंतर्गत मुंबई महापालिकेने सल्लागारांची नियुक्ती केली होती. त्यानुसार सल्लागाराकडून सविस्तर प्रकल्प अहवाल मुंबई महापालिकेला सादर होणे अपेक्षित आहे.

प्रकल्‍पावर टीका

- मुंबईला सध्या ४०० एमएलडी पाण्याची गरज आहे, पण २०० एमएलडीच्या या डिसॅलिनेशन म्हणजे खारे पाणी गोड करण्याच्या प्रकल्पाने मुंबईची पाण्याची गरज भागणार नसल्‍याचे बोलले जाते.

- या प्रकल्पाच्या उभारणीसाठी १६०० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे, तर प्रकल्प चालवण्यासाठी १९०० कोटी खर्च येणार आहे.

- प्रकल्प चालवण्यासाठी ३३ मेगावॉट क्षमतेचा वीज प्रकल्पही उभारावा लागणार आहे. त्यामुळे अवघ्या २० वर्षांसाठीच्या कालावधीचा प्रकल्पाचे आयुष्यमान असल्याने या प्रकल्पावर सुरुवातीपासूनच टीका झाली आहे.

- प्रकल्पासाठी भरसमुद्रातून ४ ते ५ किलोमीटर अंतरावरून पाणी घेण्यात येईल. त्यामुळेच मच्छीमार बांधवांचे मासेमारीचे क्षेत्रही बाधित होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

- प्रकल्पाची मागणी नसताना फक्त इस्राईलच्या कंपनीने हा प्रकल्प राबवण्याचा प्रस्ताव ठेवला, असाही आरोप सुरुवातीच्या काळात झाला होता.

टॅग्स :waterMumbaitestSea