जंजीरे धारावी किल्ल्याचे ग्रहण कायम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जंजीरे धारावी किल्ल्याचे ग्रहण कायम
जंजीरे धारावी किल्ल्याचे ग्रहण कायम

जंजीरे धारावी किल्ल्याचे ग्रहण कायम

sakal_logo
By

भाईंदर, ता. २१ (बातमीदार) : नरवीर चिमाजी आप्पांच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेल्या उत्तनजवळील जंजिरे धारावी किल्ल्याच्या सुशोभीकरणासाठी पर्यटन विभागाने मंजूर केलेल्या दहा कोटींच्या निधीवरील स्थगिती तातडीने हटविण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मात्र या आदेशांना एक महिना उलटल्यानंतरही हा निधी पर्यटन विभागाकडून महापालिकेकडे वर्ग झालेला नाही. त्यामुळे शासकीय लालफितीचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
वसई किल्ल्यावर देदीप्यमान विजयश्री मिळवण्यासाठी नरवीर चिमाजी आप्पांनी उत्तनजवळील चौक गावात असलेल्या जंजिरे धारावी किल्ल्यावरून मोर्चेबांधणी केली होती. हा ऐतिहासिक किल्ला अनेक वर्षे दुर्लक्षित होता. मात्र इतिहासप्रेमींनी त्याचे आपल्या परीने जतन केले होते. या कामाची दखल घेऊन, तसेच किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन मिरा-भाईंदर महापालिकेने किल्ल्याचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेतला. आमदार गीता जैन व खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नाने तत्कालीन मविआ सरकारमधील पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी या कामासाठी दहा कोटी रुपये मंजूर केले; पण राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर नव्या सरकारने मविआ सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांना स्थगिती दिली. त्यात जंजिरे धारावी किल्ल्याच्या निधीचाही समावेश होता. मात्र गीता जैन यांनी पाठपुरावा केल्यानंतर गेल्या महिन्यात मुख्यमंत्र्यांकडे झालेल्या बैठकीत या निधीवरील स्थगिती उठवून निधी तातडीने वितरित करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.

इतिहासप्रेमींची नाराजी
मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीला एक महिना उलटून गेला आहे. या बैठकीत घेतलेल्या निर्णयांचे अधिकृत इतिवृत्तही महापालिकेला प्राप्त झाले आहे; परंतु पर्यटन विभागाकडून मात्र दहा कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासंबंधी अद्याप कोणतीही हालचाल झालेली नाही. किल्ल्याच्या सुशोभीकरणाचा संपूर्ण प्रकल्प अहवाल तयार आहे. असे असताना केवळ निधी उपलब्ध नसल्यामुळे हे काम लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. सरकारी लालफितीच्या या कारभारावर इतिहासप्रेमी मात्र नाराजी व्यक्त करत आहेत.

मुख्यमंत्र्यांनी मंजूर निधी तातडीने वर्ग करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पर्यटन विभागाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. हा निधी लवकरच महापालिकेकडे वर्ग होईल, अशी अपेक्षा आहे.
- गीता जैन, आमदार