नव्या वर्षात कोपरी पूल होणार चौपदरी ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नव्या वर्षात कोपरी पूल होणार चौपदरी !
नव्या वर्षात कोपरी पूल होणार चौपदरी !

नव्या वर्षात कोपरी पूल होणार चौपदरी !

sakal_logo
By

ठाणे, ता. २१ (वार्ताहर) : अनेक वर्षांपासून चौपदरीकरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या कोपरी पुलाचे आवश्यक असलेले सात गर्डर रविवारी टाकण्यात आले. यामुळे कोपरी पुलाचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. अवघ्या दीड महिन्यानंतर म्हणजे पुढील वर्षाच्या मुहूर्तावर कोपरी पूल चौपदरीकरण पूर्ण होऊन ठाणेकर आणि मुंबईकरांना भेडसावणारी वाहतूक कोंडीची समस्या कायमची सुटणार आहे.
ठाणे, भिवंडी, नाशिककडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी मुख्य असलेला कोपरी पूल हा पिकअप हावरमध्ये वाहतूक कोंडीच्या जटिल समस्येत अडकत होता. सदरच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न गेल्या एक दशकापेक्षा जास्त काळ प्रलंबित राहिलेला होता. कोपरी पूल विस्ताराचा प्रस्ताव अंदाजे १४ वर्षांपूर्वी ठेवण्यात आला होता. ९ कोटी रुपयांचा प्रस्ताव २५८ कोटींवर पोहचला. २० नोव्हेंबरला कोपर पुलाचे चौपदरीकरण करण्याचा मार्ग मोकळा झाला.

.................................
केवळ डांबरीकरण शिल्लक
पुलाच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी एमएमआरडीएने शनिवार आणि रविवारच्या सुट्टीच्या दिवसात ११० टनाचे आणि ६३ मीटर लांबीचे सात गर्डर टाकण्याचे काम पूर्ण केले. यात शनिवारी तीन गर्डर आणि रविवारी चार गर्डर टाकण्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण केले. आता केवळ डांबरीकरण करण्याची प्रक्रिया शिल्लक आहे.

.......................................
पूर्व द्रुतगती मार्गाच्या विस्तारीकरणानंतर प्रस्ताव
१९५८ साली निर्माण केलेला कोपरी पूल हा सुरुवातीला दुपदरी होता; मात्र पूर्व द्रुतगती महामार्गाचा विस्तार झाल्यानंतर मात्र कोपरी पुलाचे चौपदरीकरण करण्याचा प्रस्ताव पीडब्ल्यूडीने बनविला. त्यानंतर तांत्रिक कारणास्तव किंवा रेल्वेचा ब्लॉक न मिळाल्याने प्रस्तावाला बगल मिळाली.

==============================
पुलाच्या कामावर एक नजर
* २०१८ मध्ये कोपरी पुलाच्या दोन फेजमध्ये कामाचा आराखडा बनविला
* २००३ मध्ये पीडब्ल्यूडीला पूल डिझाईन करण्यास अपयश
* ४८ कोटींच्या बजेट २५८ कोटींवर पोहचला
* २०१७ मध्ये कोपरी पुलाचे अंतिम डिझाईन तयार झाले
* पीडब्ल्यूडीने एमएमआरडीएला प्रोजेक्ट सोपविला
* २०१८ रोजी कोपरी पूल कामाला सुरुवात झाली
* १९, २० नोव्हेंबर २०२२ रोजी ७ गर्डर यशस्वी टाकण्यात आले

..................................
कोपरी पुलावर शनिवारी आणि रविवारी एकूण ७ गर्डर टाकण्याचे काम पूर्ण झाले. कोपरी पुलावरील ब्लॉकेज दूर करण्यात आले आहेत. आता लवकरात लवकर उर्वरित काम पूर्ण केल्याने कोपरी पूल वाहतुकीसाठी सुरू होईल. कुठलीही वाहतूक कोंडी होणार नाही.
- डॉ. विनयकुमार राठोड, उपायुक्त, ठाणे वाहतूक विभाग

..................................
अखेर कोपरी पुलाच्या चौपदरीकरणाचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. आता काही दिवसांत इतर कामे पूर्ण करून त्यावर डांबरीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर कोपरी पूल वाहतुकीसाठी सुरू होईल.
- राजन विचारे, खासदार