सिडको इमारतींना मुदतीपूर्वीच घरघर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिडको इमारतींना मुदतीपूर्वीच घरघर
सिडको इमारतींना मुदतीपूर्वीच घरघर

सिडको इमारतींना मुदतीपूर्वीच घरघर

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २१ ः सिडकोने उभारलेल्या इमारतींना ३० वर्षेही उलटत नाहीत तर सीवूड्समधील तब्बल ३२ सोसायट्यांतील इमारती जीर्ण झाल्या आहेत. अशा परिस्थितीत रहिवासी आणि राजकीय नेत्यांच्या आग्रहाखातर सिडकोकडून स्लॅब कोसळलेल्या सदनिकांची तात्पुरती दुरुस्ती करण्यात येते; परंतु सिडकोने दिलेल्या मुदतीनुसार ३० वर्षांआधीच इमारतींची अशी धोकादायक अवस्था झाल्यामुळे या इमारतींच्या निकृष्ट बांधकामावर आता प्रश्न उपस्थित होत आहेत.
नेरूळ नोडमधील दारावे आणि करावे या गावांचा विकास केल्यानंतर सिडकोने डीआरएस - ८७ या योजनेअंतर्गत सीवूड्स सेक्टर ४६, ४८ आणि ४८ ‘ए’ येथे सदनिका तयार केल्या. तीन मजली इमारतींमध्ये आत मोकळी जागा सोडून चार आणि पाच इमारतींच्या सोसायट्या स्थापन केल्या. बहुतांश सोसायट्यांत सिडकोने वन आरके आणि वन बीएचके अशा पाच प्रकारांतील घरे तयार केली. सीवूड्स सेक्टर ४८ मध्ये २० सोसायट्या आहेत. सेक्टर ४६ आणि सेक्टर ४८ ए मध्ये प्रत्येकी ६ सोसायट्या आहेत. एका सोसायटीत फ्लॅट ९६, तर काहींमध्ये ११६ सदनिका अशी ४ हजार घरे आहेत. गेल्या दोन वर्षांपासून या सोसायट्यांमधील सदनिकांमध्ये एका महिन्यात तीन ते चारपेक्षा जास्त घटना स्लॅब कोसळण्याच्या घडल्या आहेत. किचन, बेडरूम, बाथरूम, हॉल आदी खोल्यांमधील स्लॅब कोसळून अनेकांच्या जीवावरही बेतले आहे. काही इमारतींच्या कॉलममधील लोखंडी सळ्या दिसू लागल्यामुळे रहिवाशांचा जीव टांगणीला लागला आहे.
----------------------------------------
दुरुस्तीच्या अभावामुळे इमारतींची दुरवस्था
वारंवार प्लास्टर कोसळण्याच्या घटनांमुळे सिडकोने २००३ ला सेवानिवृत्त मुख्य सचिव एन. व्ही. मीरानी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. या समितीने सदरच्या इमारतींची पाहणी केल्यानंतर अहवाल सादर केला होता. त्यानुसार इमारतींच्या देखभाल-दुरुस्तीचा अभाव, टेरेसवर अडगळीतील ठेवलेल्या वस्तू, छतावरील पावसाळी पाणी व वॉश बेसीनमधील पाण्याचा निचरा यामधील अडथळे आणि वेळोवेळी अंतर्गत केलेले बेकायदा बदलांमुळे इमारतींची दुरवस्था झाल्याचे म्हटले आहे.
----------------------------------------------------
२०१६ ला सेक्टर सीवूड्स सेक्टर ४८ मधील शिव दर्शन आणि न्यू ओमकार व ४८ ए मधील नवे घरकुल अशा तीन सोसायट्यांमधील इमारतींना महापालिकेने धोकादायक म्हणून घोषित केले होते; परंतु या इमारतींना ३० वर्षे उलटली नव्हती, तसेच सिडकोनेही इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट केले नव्हते. अशा परिस्थितीत महापालिकेने या इमारती धोकादायक कोणत्या नियमाने केल्या होत्या. याचे उत्तर अद्याप पालिकेने दिले नाही. त्यामुळे सिडकोने या इमारतींचे निकृष्ट बांधकाम केल्यामुळे इमारतींच्या दुरुस्तीची जबाबदारी स्वीकारायला हवी.
- विशाल विचारे, शिवसेना शाखाप्रमुख, सीवूड्स
-----------------------------------------