गोपनीय तपासावर पोलिसांचा भर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोपनीय तपासावर पोलिसांचा भर
गोपनीय तपासावर पोलिसांचा भर

गोपनीय तपासावर पोलिसांचा भर

sakal_logo
By

नालासोपारा, ता. २१ (बातमीदार) : श्रद्धा हत्याकांडाचा सखोल तपास करण्यासाठी दिल्ली पोलिसांचे एक पथक मागील चार दिवसांपासून वसईत तळ ठोकून बसले आहे. आज (ता. २१) रोजी पथकाने दोघांचे जबाब नोंदवले असून, एकूण १३ जणांचे जबाब दाखल करण्यात आले आहेत. श्रद्धाच्या हत्याकांडात वसई परिसरातून नवीन माहिती मिळवण्याचा दिल्ली पथक प्रयत्न करत आहे. तसेच त्यांनी हत्याकांडाचा तपास गोपनीय करण्यास सुरुवात केली आहे.

श्रद्धा हत्याकांड समोर आल्यानंतर वसई, नालासोपारा आणि विरार परिसरातील तिला मदत करणारे, तसेच तिचे मित्र, मैत्रीण यांनी आपल्या भूमिका प्रसारमाध्यमांसमोर स्पष्ट केल्या होत्या. त्या सर्वांना दिल्ली पोलिस पथकाने बोलावून त्यांचे जबाब घेतले आहेत. श्रद्धा आणि आफताब लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्यापासून त्यांच्या संपर्कात कोण कोण आले, श्रद्धा कंपनीत काम करीत होती तेथील व्यवस्थापकापासून ते आफताबच्या मारहाणीत ती जखमी झाल्यावर दवाखान्यात दाखल होती त्या डॉक्टरपर्यंत सर्वांचे जबाब दिल्ली पोलिसांनी घेतले आहेत. पहिल्या दिवशी तीन, दुसऱ्या दिवशी चार, तिसऱ्या दिवशी चार आणि चौथ्या दिवशी दोन असे एकूण १३ जणांचे जबाब दिल्ली पोलिसांनी घेऊन सर्व हकिगत समजावून घेतली आहे. आज ओझोन हॉस्पिटलचे डॉ. शिवाप्रसाद शिंदे आणि २३ नोव्हेंबर २०२० रोजी आफताबकडून श्रद्धाला मारहाण झाल्यानंतर तुळिंज पोलिस ठाण्यात महिलेने मदत केली, त्या पूनम बिडलान या दोघांचा जबाब घेतला आहे.

श्रद्धाची दिल्लीत हत्या करून आफताब दिल्लीहून वसईत अनेक वेळा आला होता. त्या वेळी कदाचित मृतदेहाची विल्हेवाट लावताना त्याने वसईत काही पुरावा सोडला आहे का? वसईत आल्यावर तो कुणाशी भेटला होता का? श्रद्धाच्या मिसिंगप्रकरणी माणिकपूर पोलिसांना दिलेला जबाब आणि विचारपूस करण्यासाठी वसईत बोलावले होते, तेव्हा त्याने या सर्व घटनेची त्याच्या कुटुंबीयांना किंवा मित्र परिवाराला माहिती दिली होती का? या सर्व अनुषंगानेही दिल्ली पोलिस तपास करत आहेत.