पालघरमध्ये रिक्षा स्टॅन्डवर मासळीचे घाण पाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालघरमध्ये रिक्षा स्टॅन्डवर मासळीचे घाण पाणी
पालघरमध्ये रिक्षा स्टॅन्डवर मासळीचे घाण पाणी

पालघरमध्ये रिक्षा स्टॅन्डवर मासळीचे घाण पाणी

sakal_logo
By

पालघर, ता. २२ (बातमीदार) : शहरातील नवनीतभाई शहा रस्त्याच्या दुतर्फा मासळी बाजार भरतो. त्या बाजाराशेजारी सहा आसनी रिक्षांचे स्टँड आहे. या स्टँडवर दररोज मासळीचे घाणपाणी येत असल्याने प्रवाशांना व रिक्षाचालकांना घाणीचा व दुर्गंधीचा सामना दररोज करावा लागत आहे. त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे. यातून लवकरात लवकर मार्ग काढावा, यासाठी ऑटो टॅक्सी चालक-मालक सेनेने जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन यातून मार्ग काढावा, अशी मागणी करत निवेदन दिले.
जुन्या देना बँकेसमोर सहाआसनी व तीनआसनी ऑटो रिक्षाचे स्टँड आहे. या मार्गावरून दररोज पालघर ते देवखोप, पालघर ते नंडोरे, पालघर ते बोईसर व तीनआसनी ऑटो रिक्षावाले पालघर परिसरात सेवा देत आहेत; मात्र गेल्या कित्येक दिवसांपासून तेथे असलेल्या मासळी बाजारातील घाणपाणी रिक्षा स्टँडजवळ येत असल्याने प्रवाशांना व रिक्षाचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावर शेअर प्रवासी सेवा असल्याने जोपर्यंत रिक्षा पूर्णपणे भरत नाहीत, तोपर्यंत रिक्षा सुटत नसल्याने प्रवाशांना नाक दाबून बसावे लागत आहे. यातून नगर परिषदेने मार्ग काढणे अपेक्षित असताना तसे होत नसल्याचेही संघटनेचे म्हणणे आहे.
आमचा मच्छीविक्रेत्यांना कोणताही विरोध नाही, जेथे मच्छी विकली जाते, तेथील घाणपाणी स्टॅन्डकडे येत असल्याने त्याचा त्रास चालताना सहन करावा लागत आहे. याकडे नगर परिषद लक्ष देत नसल्याने जिल्हाधिकारी यांनी नगर परिषदेला यातून मार्ग काढण्याच्या सूचना आमची या त्रासातून मुक्तता करावी, अशी मागणी ऑटो टॅक्सी टेम्पो चालक-मालक सेना पालघर जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ही सकारात्मक प्रतिसाद देत यातून लवकरात लवकर मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी संघटनेस दिले आहे.

पालघर : नवनीतभाई शहा रस्त्यावरील रिक्षा स्टँडवर मासळी बाजारातील पाणी साचत आहे.