वाढीव वीजबिलामुळे ग्राहक त्रस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाढीव वीजबिलामुळे ग्राहक त्रस्त
वाढीव वीजबिलामुळे ग्राहक त्रस्त

वाढीव वीजबिलामुळे ग्राहक त्रस्त

sakal_logo
By

टिटवाळा, ता. २३ (बातमीदार) ः महावितरणकडून दिल्या जाणाऱ्या वीज मीटरमध्ये बिघाड होऊन ते बंद होणे, वीज क्षमतेनुसार रीडिंग न येणे असे प्रकार ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात होत आहेत; पण यास ग्राहकांनाच दोषी ठरवत त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा वीजबिले वसूल केली जात आहेत, अशी तक्रार ग्राहक करत आहेत. याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आमदार किसन कथोरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

महावितरणमध्ये मीटर घोटाळा सुरू आहे. यामध्ये खालपासून वरपर्यंतचे अधिकारी सामील आहेत. त्यांची सखोल चौकशी करावी, असे आमदार कथोरे यांनी सांगितले. कल्याण तालुक्यातील वासुंद्री, मोस, गोवेली, मामणोली, कुंदे, फळेगाव, उशीद, चवरे, मांजर्ली, आपटी, आणे, भिसोळ, घोटसई या गावात वीजबिल नियमित भरणारे ग्राहक आहेत; पण त्यांना भरमसाट रकमेची बिले देऊन महावितरण कंपनी झिजिया कराप्रमाणे वसुली करत आहे. वाढीव वीजबिल न भरल्यास वीज पुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे वीज ग्राहक त्रस्त झाले आहेत, असा आरोप येथील नागरिक करत आहेत. कल्याण तालुक्याच्या ग्रामीण भागातील खडवली परिसरास वीजपुरवठा करणारी वीजवाहिनी दिवसातील चोवीस तासांपैकी वीस तास बंद असते. त्यात वाढीव वीजबिलाचा सपाटा लावला जात आहे, असे वासुंद्रीचे उपसरपंच दिनेश दवणे म्हणाले. या गावातील २५ हून अधिक कुटुंबांना नियमित वीजबिले भरूनही लाख ते दीड लाख रुपयांची वाढीव वीजबिले देण्यात आलेली आहेत.
------------
वीज मीटर खराब असल्याची माहिती ग्राहकांनी वेळीच दिली, तर ते विनामोबदला बदलून दिले जात आहेत.
- भोळे, महावितरण अधिकारी
---------
महावितरणतर्फे वीजवितरण केले जाते. वीज मीटर तेच देतात. मग मीटर खराब निघाल्यानंतर ग्राहकांना नाहक भुर्दंड दिला का जातो? महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार सुरू आहे. वीज वाहिन्यांसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात; तरीही वारंवार वीज प्रवाह खंडित होत आहे. व्हिजलन्स विभाग आपले टार्गेट पूर्ण करण्यासाठी खोट्या केसेस करून वीज ग्राहकांची पिळवणूक करत आहे.
- किसन कथोरे, आमदार
---------------
महावितरण कंपनी वीजबिलाचा आकडा फुगवत आहे. सामान्य वीज ग्राहकाला लुटणे व फक्त वसुली करणे इतकाच या कंपनीचा धंदा झाला आहे.
- दिनेश चौदरी, सामाजिक कार्यकर्ता